सर्वपक्षीय उमेदवारांना दिली जाते समान वागणूक

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 14 d ago
केंद्रीय निवडणूक आयोग
केंद्रीय निवडणूक आयोग

 

सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कोणताही भेदभाव न करता समान वागणूक दिली जात आहे,’’ असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला टोला लगावला होता.

काँग्रेस नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी निवडणूक आयोगाने करावी असे काँग्रेसने म्हटले आहे. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार पानांचे निवेदन प्रसिद्धीला दिले आहेत. यात सर्व राजकीय पक्षांना समान वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. ‘सर्व राजकीय पक्ष समान पातळीवर असले पाहिजे,’ हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे ध्येय असल्याचा दावा करून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरितीने होत असल्याचे म्हटले आहे. महिलांचा सन्मान महत्त्वाचा

या प्रचार काळात महिलांच्या आत्मसन्मान कायम राहिला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. महिलांसंदर्भात अपमानकारक शब्द वापरणाऱ्यांवर आयोगाने कडक कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई कायम राहील. यासाठी संबंधित व्यक्तीच नव्हे तर संबंधित राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनासुद्धा जबाबदार धरले जाईल, असा इशाराही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.