'दहशतवादाला कधीच भगवा रंग नव्हता, नाही आणि नसेल': मुख्यमंत्री फडणवीस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (३१ जुलै) म्हटले आहे की, "दहशतवाद कधीच भगवा नव्हता, नाही आणि नसेल." मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात एका मस्जिदीजवळ मोटारसायकलमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०१ जण जखमी झाले होते. विशेष न्यायालयाने गुरुवारी सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त करताना त्यांच्याविरुद्ध "विश्वसनीय आणि ठोस पुरावे" नसल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'एक्स'वर पोस्ट केले, "दहशतवाद कधीच भगवा नव्हता, नाही आणि नसेल." या निकालावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला.

शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी या निकालाचे स्वागत केले. ते म्हणाले, "आम्ही या आदेशाने खूप आनंदी आहोत. काँग्रेस पक्षानेच त्यांना (आरोपींना) अडकवले आणि आपला अजेंडा पूर्ण करण्यासाठी 'हिंदू दहशतवाद' ही संज्ञा तयार केली, हे त्यांचे कपटपूर्ण कारस्थान होते. ते आता उघड झाले आहेत." 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत म्हटले होते की, कोणताही हिंदू दहशतवादी असू शकत नाही आणि ते आता सिद्ध झाले आहे, असा दावाही हेगडे यांनी केला.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या निकालाचे स्वागत केले. हिंदुत्वाला "दहशतवादी" संबोधून भावना दुखावल्या गेल्या होत्या, असे ते म्हणाले. अध्यात्मिकतेला धक्का देण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा त्यांनी केला.