आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केला जातो. मात्र नुकतेच जयपूरच्या फैजा रिफत या भारतीय मुस्लिम महिलेने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत (UNHRC) भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. एका भारतीय मुस्लिम महिलेनेच जागतिक मंचावर भारताच्या सर्वसमावेशकतेचे आणि दहशतवादाविरोधातील लढ्याचे प्रतिनिधित्व करणे, हे अनेक पूर्वग्रह दूर करणारे आणि प्रतीकात्मक संदेश देणारे ठरले.
संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) जागतिक व्यासपिठावर जगातील सर्व देश मानवाधिकारांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडतात. अशा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची बाजू प्रभावीपणे मांडणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण यातूनच जगासमोर देशाची खरी प्रतिमा आणि भूमिका स्पष्ट होते. याच परिषदेच्या ६०व्या सत्रात, फैजा रिफत यांनी भारताची शांतता, सर्वधर्मसमभाव आणि दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्याबाबतची अटळ वचनबद्धता अधोरेखित केली.
स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे प्रतिनिधींना संबोधित करताना रिफत म्हणाल्या की, भारताची लोकशाही ‘विविधतेत एकता’ या आपल्या प्रसिद्ध तत्त्वावर टिकून आहे. याच तत्त्वामुळे अनेक संस्कृती, धर्म आणि भाषा एकाच राष्ट्रात सलोख्याने नांदू शकल्या आहेत. त्यांनी सांगितले की, भारतीय संविधान विचार, श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते, ज्यामुळे भारत हा सर्वधर्मसमभावाचे एक जिवंत उदाहरण बनला आहे.
भारताच्या सर्वसमावेशक परंपरांचे कौतुक करतानाच, रिफत यांनी दहशतवादामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या धोक्यांवरही गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी २००८ चा मुंबई दहशतवादी हल्ला आणि नुकत्याच पहिलगाममध्ये घडलेल्या दुःखद घटनेचा उल्लेख केला. हिंसाचार कसा शांतता नष्ट करतो, निष्पाप लोकांचे प्राण घेतो आणि पर्यटनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना बाधित करतो, याची ही भीषण आठवण आहे, असे त्या म्हणाल्या. "ही कृत्ये केवळ एका राष्ट्रावरील हल्ले नाहीत, तर ती संपूर्ण मानवतेवरील हल्ले आहेत," असे त्यांनी नमूद केले.
भारताच्या लवचिकतेवर भर देताना रिफत म्हणाल्या की, अशा आव्हानांना न जुमानता, भारतातील लोक सहिष्णुता, मानवाधिकार आणि शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी वचनबद्ध आहेत. त्यांनी संवाद आणि अहिंसक मार्गाने संघर्ष सोडवण्याच्या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यात भारताची जबाबदार भूमिका अधोरेखित केली.
रिफत यांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने जागतिक प्रतिसाद देण्याचेही आवाहन केले. अतिरेकी हिंसाचार आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला. "केवळ सहकार्य, आदर आणि सामूहिक निर्धारानेच आपण द्वेषाचा सामना करू शकतो आणि आपले सामायिक भविष्य सुरक्षित करू शकतो," असे त्यांनी परिषदेला सांगितले.
भारत संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या तत्त्वांनुसार शांतता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी जगभरातील राष्ट्रांसोबत सहकार्य करत राहील, याचा रिफत यांनी पुनरुच्चार केला. रिफत यांच्या भाषणाने भारताचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित केला. भारत एकीकडे आपल्या बहुलवादी स्वरूपाचे जतन करत आहे, तर दुसरीकडे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि एक सुरक्षित व शांत जग निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करत आहे, याची आठवण त्यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाला करून दिली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -