'डिजिटल गोल्ड'मध्ये गुंतवणूक करताय? 'सेबी'चा मोठा इशारा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली

बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या 'सेबी'ने (Sebi) शनिवारी गुंतवणूकदारांना 'डिजिटल' किंवा 'ई-गोल्ड' उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध केले आहे. सेबीने म्हटले आहे की, अशी उत्पादने त्यांच्या नियामक चौकटीबाहेर येतात आणि त्यात मोठे धोके आहेत.

काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म 'डिजिटल गोल्ड' किंवा 'ई-गोल्ड' उत्पादनांना 'प्रत्यक्ष सोन्यातील' (physical gold) गुंतवणुकीचा सोपा पर्याय म्हणून प्रोत्साहन देत असल्याचे सेबीच्या निदर्शनास आले. त्यानंतर हा सावधगिरीचा इशारा देण्यात आला.

"या संदर्भात, हे सूचित केले जाते की, अशी 'डिजिटल गोल्ड' उत्पादने 'सेबी-नियमित' सोन्याच्या उत्पादनांपेक्षा वेगळी आहेत. कारण ती ना 'सिक्युरिटीज' म्हणून अधिसूचित आहेत, ना 'कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज' म्हणून नियंत्रित आहेत. ती पूर्णपणे सेबीच्या कार्यक्षेत्राबाहेर चालतात," असे नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे.

"अशा डिजिटल गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणूकदारांसाठी मोठे धोके असू शकतात. यामुळे गुंतवणूकदारांना 'काउंटर पार्टी' (ज्यांच्याकडून सोने घेताय ती व्यक्ती/संस्था) आणि 'ऑपरेशनल' (तांत्रिक) धोक्यांचा सामना करावा लागू शकतो," असेही त्यात म्हटले आहे.

सेबीने पुढे स्पष्ट केले की, नियमित सिक्युरिटीजसाठी लागू असलेले 'गुंतवणूकदार संरक्षण' (investor protection) या अनियंत्रित डिजिटल गोल्ड योजनांना लागू होणार नाही.

नियामकाने सांगितले की, गुंतवणूकदार सेबी-नियमित साधनांद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकतात. यामध्ये म्युच्युअल फंडांद्वारे ऑफर केलेले 'गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड' (Gold ETFs), 'एक्सचेंज-ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स' आणि स्टॉक एक्सचेंजवर व्यापार करण्यायोग्य 'इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स' (EGRs) यांचा समावेश आहे.

शिवाय, या सेबी-नियमित सोन्याच्या उत्पादनांमधील गुंतवणूक नोंदणीकृत मध्यस्थांमार्फत (registered intermediaries) केली जाऊ शकते आणि ती नियामकाने ठरवलेल्या नियामक चौकटीद्वारे नियंत्रित केली जाते, असेही त्यात म्हटले आहे.