आमच्या पक्षाने देशासाठी बंदुकीच्या गोळ्या झेललेल्या आहेत आणि गरज पडल्यास पुन्हा त्यासाठी आम्ही तयार आहोत, असा दावा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी केला. तसेच, "काश्मीरमध्ये दगडफेक व दहशतवाद पुन्हा सुरू करण्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रयत्न आहेत," असा भाजपने केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे.
येथील पक्षाच्या ब्लॉक अध्यक्ष व सचिवांच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. जम्मू-काश्मीरचे पुन्हा एकदा विभाजन करण्याची मागणीही फारुख अब्दुल्लांनी फेटाळून लावली आहे. "ही मागणी मूर्खपणाची आणि अज्ञानातून केलेली आहे. २०१९ मध्ये स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलेल्या लडाखचाही भविष्यात पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये समावेश होईल," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या काही नेत्यांनी जम्मूला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी केल्याबाबत, तसेच या भूमिकेला पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद गनी लोन आणि श्रीनगरचे माजी महापौर जुनैद मट्ट यांनी पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता, अब्दुल्ला म्हणाले की, आमच्या पक्षाने अशा विचारांना कधीच प्रोत्साहन दिले नाही.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाझामध्ये दीर्घकालीन शांततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'बोर्ड ऑफ पीस'मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याबाबत विचारले असता, अब्दुल्ला म्हणाले की दोन्ही नेत्यांमध्ये जुनी मैत्री आहे, जरी त्यात काही चढउतार आले असले तरी. ही मैत्री पुन्हा दृढ होईल आणि आपण पुढे जाऊ.