प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबवर फसवणुकीचे ३२ गुन्हे दाखल!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब

 

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब, त्याचा मुलगा अनोश हबीब आणि एका सहकाऱ्यावर फसवणुकीचे तब्बल ३२ गुन्हे दाखल झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. 'फॉलिकल ग्लोबल कंपनी'च्या (FLC) नावाखाली एका योजनेतून ५०-७०% इतक्या मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून, प्रत्येक गुंतवणूकदाराकडून ५ ते ७ लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

बरेलीतील पीडितांनी केलेल्या तक्रारीनुसार, हबीब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीवर प्रचंड परताव्याचे आश्वासन दिले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळाला नाही.

या फसवणुकीनंतर, पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, हा घोटाळा ५ ते ७ कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी जावेद हबीब, त्याचा मुलगा आणि सहकाऱ्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. तसेच, ते देश सोडून पळून जाऊ नयेत, यासाठी 'लुकआउट नोटीस'ही जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, जावेद हबीबच्या वकिलाने म्हटले आहे की, "हृदयाच्या आजारामुळे आणि वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे ते वैयक्तिकरित्या हजर राहू शकले नाहीत. मात्र, ते तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत." या हाय-प्रोफाइल प्रकरणामुळे, ब्रँडेड फ्रँचायझीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.