रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांकडून कपडे, घर सजावटीचे साहित्य, उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे. उन्हाचा कडाका सध्या वाढल्याने सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठ गजबजून जात आहे. सायंकाळी कॅम्प परिसरात खवय्यांची गर्दी होत आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी सर्वांना एकत्र आणल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
रमजान ईद गुरुवारी आहे. त्यानिमित्ताने शिवाजी मार्केट, रावसाहेब केदारी रोड, भोपळे चौक, महावीर चौक, कोहिनूर चौक, कुरेशी मस्जिद कॉर्नर, कॅन्टोन्मेंट जुनी इमारत कॉर्नर, राणी लक्ष्मीबाई उद्यान, बाटा चौक, अरोरा टॉवर कॉर्नर, सेंट्रल स्ट्रीट तसेच महात्मा गांधी रस्ता अशा परिसरांत ग्राहकांची गर्दी होत आहे. मॉलप्रमाणेच रस्त्यांवरील विक्रेत्यांकडेही अनेक जण खरेदी करत आहेत.
कॅम्प भागात रमजाननिमित्त खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे चिकन टिक्का, मलई टिक्का, पहाडी टिक्का, चिकन सामोसा, चिकन कटलेट, चिकन क्रिस्पी, पालक चिकन, शाही रोल, पालक रोल तसेच गोड पदार्थांमध्ये कॅरामल कस्टर्ड, अरेबियन पुडिंग आदी पदार्थ आहेत. उपवास सोडण्याच्या वेळेस तेथे नागरिकांची गर्दी लोटते.
ईदनिमित्त बाजारात विविध प्रकारच्या शेवया उपलब्ध आहेत. बनारसी, लाडू, रोस्टेड गुलशन, मिठी फेरनी, भाजलेल्या शेवया असे विविध प्रकार आहेत. शेवयांचे दर २०० ते ५०० रुपये किलो आहेत. बनारसी शेवई सर्वांत महाग आहे, अशी माहिती बाबाजान शेवईचे दुकानदार शाहीद शेख अब्बास यांनी दिली.
काजू, बदाम पिस्ता, चारोळी, वेलदोडा, खोबरे, तूप, बिर्याणीसाठी असलेले गरम मसाले, दूध मसाला, शीरखुर्मा मसाला, फालुदा विक्रीसाठी होलसेलच्या भावात उपलब्ध असल्याचे 'डॉल्फिन ड्रायफ्रूट'चे व्यावसायिक अकबर खान यांनी सांगितले.