निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाब यासारख्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी सर्व सरकारी खाती, मंत्रालयांना तेल आणि साखरेच्या वाढत्या वापराबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे. यासाठी, सरकारी कार्यालयांमधील त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमधील कॅन्टीनमध्ये, सार्वजनिक उपक्रमांच्या उपहारगृहांमध्ये समोसा, कचोरी, वडा-पाव, फ्रेंच फ्राइज यासारख्या भारतीय खाद्यपदार्थांमधील साखर आणि तेलाच्या प्रमाणाची अचूक माहिती दर्शविणारे फलक लावण्यास सांगण्यात आले आहेत.
लठ्ठपणाविरोधात जनजागृतीसाठी लिफाफे, लेटरहेड, नोंदपुस्तिका, फोल्डर यासारख्या स्टेशनरी साहित्यावर आरोग्यविषयक संदेश छापले जावेत, अशी सूचनाही आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी यासंदर्भात २१ जूनला सर्व मंत्रालये, विभागांना पत्र पाठवून याबाबतच्या सूचना वजा आवाहन केले आहे. या पत्रात नमूद केले आहे, की भारतात प्रौढ नागरिकांमध्ये तसेच बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग यासारख्या आजारांचा धोका वाढतो. मानसिक आरोग्य, हालचाल, जीवनमान यावरही परिणाम होतो.
'फिट इंडिया' मोहिमेचा दाखला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरुद्ध लढा देण्यासाठी जीवनशैलीत बदलाचे केलेले आवाहन या पत्रात आरोग्य सचिवांनी उद्धृत केले आहे. पंतप्रधानांनी जानेवारी महिन्यात झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये 'फिट इंडिया' मोहिमेचा उल्लेख केला होता. तसेच मन की बात कार्यक्रमात त्यांनी दैनंदिन आहारात तेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांतर्गत निरोगी जीवनशैलीच्या प्रचारासाठी तेल व साखरेच्या अत्याधिक वापराला मर्यादा घालणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये तेल व साखरेच्या प्रमाणाची माहिती देणारे फलक लावण्याच्या उपक्रमाचा आग्रह धरण्यात आला आहे.
येथे झळकणार ठळक संदेश
शाळा, कार्यालये, सार्वजनिक संस्थांमधील फलक हे आहारातील चरबी आणि साखर याविषयी ठळकपणे संदेश देतील. त्यासाठी सर्व विभाग, कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, आणि इतर संस्थांनी उपाहारगृहे, लॉबी, बैठकस्थानी (मीटिंग रूम्स) साखर व तेलाच्या वापराबद्दलचे माहितीफलक डिजिटल किंवा स्थिर स्वरूपात लावावेत. याशिवाय, सर्व अधिकृत स्टेशनरीवर आणि प्रकाशनांवर लठ्ठपणाविरोधात लढ्याची आठवण करून देणारे आरोग्यविषयक संदेश छापावेत, असेही या पत्रामध्ये आरोग्य सचिवांनी म्हटले आहे.
सकस आहार, व्यायामावर भर
सकस आहार आणि शारीरिक हालचालींवर भर देणाऱ्या व्यायामाला प्रोत्साहन देणे, फळे, भाजीपाला, कमी फॅट्स असलेल्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश करणे, अधिक साखरयुक्त पेये आणि अधिक फॅटयुक्त पदार्थांचा वापर कमी करणे, 'लिफ्ट' ऐवजी जिन्याचा वापर, चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध कर उपलब्ध करून देणे, या संदेशांवरही सार्वजनिक ठिकाणी भर दिला जावा अशी साद आरोग्य सचिवांनी घातली आहे.
लठ्ठपणाचे वाढते प्रमाण
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ (२०१९-२१) नुसार शहरी भागांतील प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीमध्ये लठ्ठपणाची किंवा वजनवाढीची समस्या आढळून आली आहे. बालकांमध्ये लठ्ठपणाला चुकीचा आहार आणि शारीरिक हालचालींची, व्यायामाची कमतरता कारणीभूत ठरली आहे. आरोग्यविषयक नियतकालिक 'लॅन्सेट'च्या अध्ययनानुसार भारतात २०२१ मध्ये १८ कोटी प्रौढ व्यक्ती लड्डु होत्या. हेच प्रमाण २०५० पर्यंत ४४.९ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारत जगात लठ्ठपणाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक भार सहन करणारा देश ठरेल.