जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि तमिळनाडूसह देशाच्या विविध भागांमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, विविध घटनांमध्ये किमान १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे झारखंडमध्ये पाच, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन, तर तमिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पुराने मोडला विक्रम
जम्मू-काश्मीरमधील बहुतेक भागांमध्ये शनिवारी रात्रभर आणि रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जम्मूमध्ये गेल्या २४ तासांत १९०.४ मिमी पावसाची नोंद झाली, जो या शतकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे. या पुरामुळे जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील एका महत्त्वाच्या पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.
जम्मू शहरातील जानीपूर, रूपनगर आणि संजयनगरसह अनेक भागांमधील रस्ते आणि घरे पाण्याखाली गेली आहेत. येथील एका हॉस्टेल कॉम्प्लेक्समध्ये पुराचे पाणी शिरल्याने राज्य आपत्ती निवारण दलाने (SDRF) आयआयआयएमच्या ४५ विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवले. पाण्याची पातळी सात फुटांपेक्षा जास्त असल्याने, बचाव पथकाला अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी पाच तास लागले.
हवामान विभागाने २७ ऑगस्टपर्यंत ढगफुटी, अचानक येणारा पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला असून, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
झारखंड आणि हिमाचलमध्येही बिकट परिस्थिती
झारखंडच्या अनेक भागांमध्येही मुसळधार पाऊस पडत असून, मंगळवार सकाळपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी घरे आणि पुलांचे नुकसान झाले आहे.
हिमाचल प्रदेशातही पावसाने मोठे नुकसान केले आहे. मध्यम ते मुसळधार पावसामुळे दोन राष्ट्रीय महामार्गांसह ४०० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. मंडी जिल्ह्यात सर्वाधिक २२१ रस्ते बंद आहेत. याशिवाय, २०८ ट्रान्सफॉर्मर आणि ५१ पाणीपुरवठा योजनांमध्येही व्यत्यय आला आहे. हवामान विभागाने राज्यातील सात जिल्ह्यांना ३० तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे.