पुणे : "भारतात हिंदू-मुस्लिम वाद होत राहावेत, हाच पाकिस्तानचा प्रयत्न असतो. फाळणी, काश्मिरी पंडितांचे स्थलांतर यामागे हेच कारण आहे आणि म्हणूनच पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू-मुस्लिम वादामुळे देशाचे नुकसान झाले आहे", असे प्रतिपादन देशाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबुल्लाह यांनी सोमवारी केले. 'काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरात प्रशासनही काही प्रमाणात दोषी आहे', असेही ते म्हणाले.
'सरहद, पुणे' यांच्यातर्फे आयोजित भारताचे माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले स्मृती व्याख्यानात 'सुशासन : कल्पना की वास्तव' या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, 'सरहद' संस्थेचे संजय नहार, शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे, अनुज नहार आदी उपस्थित होते.
हबीबुल्लाह म्हणाले, "हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, यात तथ्य नाही. आपल्या इतिहासातही मुस्लिम बादशहांच्या काळातील दरबारातील मंत्री हिंदू होतेच. काश्मिरमध्येही स्वातंत्र्यानंतर हिंदू-मुस्लिम संबंध उत्तम होते. मात्र १९८०-९०च्या आसपास तेथील वातावरण गढूळ झाले. काश्मिरी पंडित अल्पसंख्य असल्याने त्यांना सुरक्षिततेचे आश्वासन हवे होते. ते देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने त्यांनी स्थलांतर केले."
सुशासन प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी नागरिकांची आहे, हे अधोरेखित करताना ते म्हणाले, "आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे सत्ता लोकांच्या हातात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. पारदर्शकता, उत्तरदायित्व ही सरकारची जबाबदारी असली तरी सरकारला उत्तरदायी करणे, हे नागरिकांचे काम आहे. त्यासाठी माहितीच्या अधिकारासारख्या अधिकारांचा उपयोग आपण केला पाहिजे. केवळ लोकशाही असणे पुरेसे नाही, लोकशाही व्यवस्थेचा उपयोग करणे गरजेचे आहे.'
डॉ. करीर म्हणाले, "प्रशासकीय सुधारणांमुळे सुशासन अस्तित्वात येऊ शकत नाही, तो सुशासनाचा केवळ एक भाग आहे. सरकार आणि लोकांनी एकत्र येणे, त्यांचा परस्परांवर विश्वास असणे आणि तो विश्वास वृद्धिंगत होणे, हे सुशासनात अभिप्रेत आहे. सध्या तशी परिस्थिती नाही. माहितीचा अधिकार, कायद्याचे राज्य आणि पारदर्शकता, हा सुशासनाचा गाभा आहे. सुशासन आणण्यासाठी समाजाने एकत्र येणे, समाजभान असणे गरजेचे आहे." यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, गटविकास अधिकारी डॉ. प्रकाश पोळ, निवृत्त विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांना डॉ. माधव गोडबोले स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.