लडाख प्रशासनाने शनिवारी रात्री, हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेतल्याचे आणि त्यांना जोधपूरच्या तुरुंगात हलवल्याचे समर्थन केले आहे. त्यांच्या कथित प्रक्षोभक भाषणांमुळेच बुधवारी लेहमध्ये हिंसाचार उसळला, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असा दावा प्रशासनाने केला आहे.
"लडाखच्या शांतताप्रिय लेह शहरात सामान्य परिस्थिती पुनर्स- ्थापित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी, वांगचुक यांना सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या पुढील कृतींपासून रोखणेही आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रशासनाने त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) ताब्यात घेऊन जोधपूरला हलवण्याचा निर्णय घेतला," असे लेह प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वांगचुक यांनी प्रक्षोभक भाषणे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा आरोपही प्रशासनाने केला आहे.
वांगचुक, जे लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी तीन आठवड्यांच्या उपोषणावर बसले होते, त्यांच्या उपोषणाच्या १५ व्या दिवशी हिंसाचार उसळला होता.
"गृह मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी सरकारने स्पष्ट संवाद साधूनही आणि बैठकीपूर्वी चर्चेची ऑफर देऊनही, वांगचुक यांनी आपला उपोषण सुरूच ठेवले," असे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने दावा केला की, वांगचुक यांच्या "प्रक्षोभक भाषणांमुळे, नेपाळमधील आंदोलने आणि 'अरब स्प्रिंग'च्या संदर्भांमुळेच" २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली, ज्यात इमारती आणि वाहने जाळण्यात आली.
लडाखमधील अनेक धार्मिक, सामाजिक आणि राजकीय पक्षांनी वांगचुक यांना अटक करण्याच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. दरम्यान, लेह शहरात संचारबंदी कायम आहे आणि कारगिल शहरातही मोठी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वांगचुक यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी कारगिल शहरात बंद पाळण्यात आला होता.