दुबईचे युवराज, उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी आज भारतातील आघाडीच्या व्यवस्थापन संस्थान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (आयआयएम अहमदाबाद) च्या पहिल्या परदेशी कॅम्पसचे दुबईत उद्घाटन केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूएईचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाचे कार्यकारी मंत्री डॉ. अब्दुलरहमान अब्दुलमन्नान अल अवार यांनी या समारंभाला उपस्थिती लावली.
प्रधान यांनी सांगितले की, शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते आयआयएम अहमदाबादच्या दुबई कॅम्पसचे उद्घाटन होणे हा मोठा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनाला हे एक मोठे पाऊल आहे. आयआयएम अहमदाबादचा दुबई कॅम्पस भारतातील सर्वोत्तम गोष्टी जगापर्यंत पोहोचवेल. दुबईने आयआयएम अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसला यजमानपद देत ‘भारतीय आत्मा, जागतिक दृष्टिकोन’ या भावनेची उत्तम सुरुवात केली आहे. त्यांनी भारत-यूएई शैक्षणिक सहकार्याला नवी उंची देण्यासाठी शेख हमदान यांचे आभार मानले.
भारताचे यूएईमधील राजदूत संजय सुधीर, दुबईतील भारताचे वाणिज्यदूत सतीश सिवन, आयआयएम अहमदाबादचे संचालक मंडळाचे अध्यक्ष पंकज पटेल, संचालक प्राध्यापक भरत भास्कर आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेख हमदान यांच्यासोबत यूएईचे मान्यवर उपस्थित होते. यात कॅबिनेट अफेअर्सचे मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गर्गावी, आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रीम बिन्त इब्राहिम अल हाशिमी, शिक्षणमंत्री सारा बिन्त युसूफ अल अमिरी, अर्थ आणि पर्यटन विभागाचे महासंचालक हेलाल सईद अल मर्री आणि नॉलेज अँड ह्युमन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या महासंचालक आयशा अब्दुल्ला मिरान यांचा समावेश आहे.
प्रधान यांनी यूएईच्या उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनाचे कार्यकारी मंत्री डॉ. अब्दुलरहमान अल अवार यांची भेट घेतली. दोन्ही बाजूंनी उच्च शिक्षणातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. ज्ञानाचे पूल बांधण्याचे आणि ज्ञान, नवोन्मेष आणि संशोधन यांना व्यापक सामरिक भागीदारीचा मुख्य घटक बनवण्याचे ठरले. गंभीर आणि उदयोन्मुख क्षेत्रांतील संयुक्त संशोधन, क्षमता वृद्धी आणि सांस्कृतिक तसेच शैक्षणिक देवघेव यावर चर्चा झाली.
प्रधान यांनी डॉ. अब्दुलरहमान अल अवार यांचे आभार मानले. त्यांनी दुबईतील भारतीय शैक्षणिक संस्थांचे योगदान, विशेषतः परस्पर प्राधान्यांना चालना देणे आणि जागतिक जोडणी वाढवण्यासाठी दिलेल्या समर्थनाचे कौतुक केले. यूएईत आणखी उच्च दर्जाच्या भारतीय संस्था स्थापन करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारत हा प्रतिभेचा जागतिक केंद्र आहे आणि यूएई हे जागतिक आर्थिक केंद्र आहे, असे ते म्हणाले. भारत आणि यूएई दोन्ही देश लोक-लोक संपर्क मजबूत करण्यासाठी आणि त्यांचे जुने, दृढ संबंध आणखी बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहेत.