इस्लाईल-इराण संघर्षांदरम्यान अमेरिकेने इराणचे जमिनीखालील अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंकर उद्ध्वस्त करणाऱ्या मिसाइलचा वापर केल्यानंतर आता अशाच प्रकारची यंत्रणा भारत विकसित करणार आहे. इराणच्या फोर्दो अणुप्रकल्पावर अमेरिकेने जीबीयू-५७-ए मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर्सचा मारा केला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताकडून या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात 'डीआरडीओ कडून 'अग्नी-५' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीवर काम करत आहे. मूळ अण्वस्त्राची क्षमता पाच हजार किलोमीटर आहे. मात्र, त्याच्या सुधारित श्रेणीच्या मिसाइलमधून ७५०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेली जातील, मजबूत संरक्षित भूमिगत बंकरांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येईल.
'बंकर बस्टर' म्हणजे काय ?
'बंकर बस्टर्स' हे खास डिझाईन केलेले क्षेपणास्त्र आहे. भूमिगत लष्करी बंकर, कमांड सेंटर्स; तसेच शस्त्रसाठा साठवण्यासाठी वापरण्यात येणारी मजबूत संरक्षित ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी बनवलेले असतात. काँक्रिट, खडक आणि मातीच्या थरांना भेदून जमिनीखाली असलेले लक्ष्य हे बॉम्ब सहजपणे गाठतात. अमेरिकेच्या लष्कराकडे सर्वांत शक्तिशाली ३० हजार पाउंड वजनाचा मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर आहे. इराणमधील दोन अणुप्रकल्पांवर त्याचा उपयोग झाला. १५ वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन करून ते विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
कशी आहे क्षमता ?
नवीन क्षेपणास्त्राची क्षमता अडीच हजार किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीखाली ८० ते १०० मीटरपर्यंत जाऊन स्फोट घडवून आणण्याची त्याची क्षमता असेल. पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांमध्ये जमिनीखाली असणारी बंकर आणि अन्य युद्धविषयक यंत्रणा निष्प्रभकरण्यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे.
'अग्नी-५' चे दोन पॅटर्न
'अग्नी-५' क्षेपणास्त्राच्या दोन नव्या पॅटर्नचा सध्या विकास सुरू आहे. एक भूपृष्ठावरील लक्ष्यासाठी आहे, तर दुसरा भूमिगत इमारती उद्ध्वस्त करण्यासाठी विकसित केला जात आहे. अमेरिकेच्या जीबीयू-५७ प्रमाणे ती काम करणार आहे. आठ टनांपर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची त्याची क्षमता असणार आहे. नवीन क्षेपणास्त्रे मॅक ८ ते मॅक २० हायपरसॉनिक गती गाठण्याची अपेक्षा आहे. जगातील सर्वात प्रगत क्षेपणास्त्रांच्या यादीत त्यांचा समावेश होणार आहे.