पाकिस्तानमधील भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी भारताचा आग्रह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताने मंगळवारी पाकिस्तानला त्यांच्या ताब्यात असलेल्या १५९ भारतीय मच्छिमार आणि नागरिक कैद्यांची लवकर सुटका करण्याची विनंती केली. या कैद्यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असल्याने ही मागणी करण्यात आली आहे.

तत्काळ राजनैतिक संपर्काची मागणी
याव्यतिरिक्त, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या २६ नागरिक कैदी आणि मच्छिमारांना त्वरित राजनैतिक संपर्क (consular access) उपलब्ध करून देण्यास भारताने सांगितले आहे. हे कैदी भारतीय असावेत असे मानले जाते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिली.

कैदी आणि मच्छिमारांची यादींची देवाणघेवाण
२००८ च्या करारानुसार, दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देशांकडून नागरिक कैदी आणि मच्छिमारांच्या यादींची देवाणघेवाण केली जाते. याच प्रक्रियेअंतर्गत भारताने ही विनंती केली आहे. भारताने आपल्या ताब्यात असलेल्या ३८२ नागरिक कैदी आणि ८१ मच्छिमारांची नावे पाकिस्तानला दिली आहेत, जे पाकिस्तानी आहेत किंवा पाकिस्तानी असावेत असे मानले जाते.

त्याचप्रमाणे, पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या ५३ नागरिक कैदी आणि १९३ मच्छिमारांची नावे भारताला दिली आहेत. हे कैदी भारतीय आहेत किंवा भारतीय असावेत असे मानले जाते, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

भारताची वचनबद्धता
"भारत सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या नागरिक कैदी, मच्छिमार आणि त्यांच्या बोटी तसेच बेपत्ता भारतीय संरक्षण कर्मचाऱ्यांची लवकर सुटका आणि मायदेशी पाठवण्याची मागणी केली आहे," असे निवेदनात म्हटले आहे. "पाकिस्तानला १५९ भारतीय मच्छिमार आणि नागरिक कैद्यांची लवकर सुटका आणि मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे, ज्यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

नवी दिल्लीने इस्लामाबादला विशेषतः विनंती केली आहे की, सर्व भारतीय नागरिक कैदी आणि मच्छिमारांच्या सुटकेपर्यंत आणि मायदेशी पाठवेपर्यंत त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करावे.

मानवीय मुद्द्यांना प्राधान्य
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की भारत कैदी आणि मच्छिमारांशी संबंधित सर्व मानवीय मुद्द्यांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्यास कटिबद्ध आहे. "या संदर्भात, भारताने पाकिस्तानला भारताच्या ताब्यात असलेल्या ८० पाकिस्तानी नागरिक कैदी आणि मच्छिमारांच्या राष्ट्रीयत्व पडताळणी प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानकडून राष्ट्रीयत्वाची पुष्टी न झाल्यामुळे त्यांची मायदेशी पाठवणी प्रलंबित आहे," असे मंत्रालयाने सांगितले.

प्रयत्नांना यश
सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे, २०१४ पासून पाकिस्तानमधून २,६६१ भारतीय मच्छिमारांना आणि ७१ भारतीय नागरिक कैद्यांना मायदेशी परत आणले आहे. "यात २०२३ पासून आजपर्यंत पाकिस्तानमधून परत आणलेल्या ५०० भारतीय मच्छिमार आणि १३ भारतीय नागरिक कैद्यांचा समावेश आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.