दानिश अली
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील एका दुर्गम कोपऱ्यात एकेकाळी दहशतवादाचे मोठे सावट होते. तेथील नागरिकांच्या सामान्य जीवनावर आणि शिक्षणावर याचा मोठा परिणाम झाला. परंतु तेथील एका महिलेच्या धैर्याने आणि दूरदृष्टीने मोडकळीस आलेल्या एका कल्पनेचे यशस्वी संस्थेत रूपांतर केले.
आर्मी गुडविल स्कूल (एजीएस) बांदीपोराच्या प्राचार्य शबनम कौसर यांनी एका शाळेचा प्रवास बदलला. हजारो मुलांच्या मनात त्यांनी आशेचा किरण पेरला. चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडच्या सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारापर्यंत पोहोचला. त्यांची ही कहाणी थक्क करणारी आहे.
बांदीपोरातल्या गुंडबाल कालुसा या साध्या गावात शबनम यांचा जन्म झाला. काश्मीरमधील कठीण परिस्थितीत त्यांचे संघर्षमय बालपण गेले. स्थानिक संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे हेच शिक्षण त्यांच्या सशक्तीकरणाचे सर्वात मोठे साधन बनले.
२००४ मध्ये खोऱ्यात दहशतवादाने दैनंदिन जीवन विस्कळीत केले होते. तेव्हा भारतीय सैन्याच्या १४ राष्ट्रीय रायफल्सने खारपोरा, बांदीपोरात शिक्षणाचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी शाळा सुरू केली. अशाप्रकारे मोठ्या थाटात नाही, तर गरजेतून आर्मी गुडविल स्कूल बांदीपोराचा जन्म झाला.
शबनम यांनी त्यावेळच्या आठवणी ताज्या केल्या. त्या सांगतात, “मी तेव्हा विद्यार्थिनी होते. त्यावेळी शिक्षकाच्या जागेसाठी जाहिरात पाहिली. मनात काहीतरी आले आणि मी अर्ज केला.”
त्यावेळी शबनम यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तेव्हा दुसऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला प्राचार्यपद मिळाले. पहिल्यावेळी फक्त चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. सगळ्यांचे मनोधैर्य खचले होते. शाळा सुरू झाल्यावर अवघ्या २० दिवसांतच प्राचार्यांनी राजीनामा दिला.
शबनम सांगतात, “त्यांनी मला किल्ल्या दिल्या आणि म्हणाले, चार विद्यार्थ्यांनी शाळा चालत नाही. किल्ल्या व्यवस्थापनाला द्या आणि कॉलेजला परत जा." परंतु शबनम यांनी हार मानली नाही.
त्यांनी रोज एकट्याने शाळेत जणेयेणे सुरू ठेवले. त्या सांगतात, “वर्ग नव्हते, कर्मचारी नव्हते, मूलभूत सुविधाही नव्हत्या. फक्त काही प्लॅस्टिकच्या खुर्च्या, दोन गोल टेबलं आणि एक फळा होता.” तरीही त्यांना अपयशात यशाची शक्यता दिसली.
लवकरच त्यांच्या प्रयत्नांकडे व्यवस्थापनाचे लक्ष गेले. त्यांच्या जिद्दीकडे बघून त्यांना प्राचार्यपद देण्यात आले. तिथून एजीएस बांदीपोराच्या प्रेरणादायी बदलाची खरी सुरुवात झाली.
कोणताही अनुभव, साधने किंवा आधार नसताना त्यांनी प्राचार्यपद स्वीकारले. कुटुंबाकडूनही पाठिंबा नव्हता. तरी त्यांनी घरोघर जाऊन पालकांना मुले शाळेत पाठवण्याची विनंती केली. या अनुभवाविषयी त्या सांगतात, “लोक हसत. शाळेला इमारत नाही, कर्मचारी नाहीत, अशा शाळेचा काय भरोसा?? आज आहे उद्या नाही.. असं लोक म्हणायचे.”
ऑक्टोबर २००४ मध्ये मोठा बदल झाला. शाळेत २९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शबनम यांनी शाळेचा पहिला वार्षिक दिन साजरा केला. या खडतर प्रवासातून हे साध्य करणे म्हणजे असामान्यच होते. स्थानिक केबल टीव्ही चॅनलवर हा कार्यक्रम दाखवला गेला. प्रतिसाद प्रचंड मिळाला. त्या पुढे सांगतात, “पुढच्या वर्षात जवळपास २०० प्रवेश झाले आणि माझे प्रयत्न यशस्वी झाले."
काश्मीरच्या पुरुषप्रधान आणि संघर्षग्रस्त भागात सैन्याच्या शाळेची तरुण प्राचार्या म्हणून शबनम यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. त्या सांगतात, “मला धमक्या मिळाल्या, त्रास दिला गेला, लोकांनी माझ्याबद्दल वाईट बोललं. माझ्या पालकांनाही सुरुवातीला माझी काळजी वाटायची. त्यामुळे त्यांनी मला साथ दिली नाही.”
पण त्यांचे काका, बांदीपोरातले आदरणीय शिक्षक, त्यांचा आधार बनले. शबनम सांगतात, “ते नेहमी म्हणायचे, ‘तू ही शाळा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बनवशील.’” काकांच्या या विश्वासाने शबनम यांना कठीण काळात बळ दिले.
शबनम यांनी मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले. त्या सांगतात सीमा ओलांडल्या. या आठवणी विषयी त्या म्हणतात, "त्या काळात लोक मुलींना स्थानिक शाळेतही पाठवत नसत. बाहेरच्या स्पर्धांना तर सोडाच.” त्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसह मुलींना सहअभ्यासिक आणि अभ्यासेतर उपक्रमांत सहभागी करून घेतले. जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये मुली भाग घेऊ लागल्या.
शबनम अभिमानाने सांगतात, “आता प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात आमच्या शाळेच्या मुलींचा सर्वाधिक सहभाग असतो." शाळेच्या कामासोबत शबनम यांनी स्वतःचे शिक्षण थांबवले नाही. त्यांनी दोन पदव्युत्तर पदव्या आणि बी.एड. पूर्ण केले. त्या म्हणतात, “शिक्षणाने मला सशक्त केलं. तेच सशक्तीकरण माझ्या समाजात परत द्यायचं होतं.”
या वर्षी त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला सन्मान मिळाला. इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडने त्यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार दिला.
देशभरातील दीड लाख शाळांमधून फक्त एक हजार प्राचार्यांची निवड झाली. याविषयी शबनम सांगतात, “हा फक्त माझा नव्हे, तर एजीएस बांदीपोराचा, शिक्षणापासून वंचित मुलींचा आणि स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक पालकाचा विजय आहे.”
या पुरस्कारात रोख बक्षीस, ट्रॉफी आणि भेटवस्तूंचा समावेश आहे. पण त्यापेक्षा मान्यता महत्त्वाची आहे. “चार विद्यार्थ्यांसह एकटीने शाळा चालवणाऱ्यासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे,” असं शबनम सांगतात.
आज एजीएस बांदीपोरा आता खडतर परिस्थितीतली शाळा नाही. तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. विद्यार्थी सातत्याने पुरस्कार जिंकतात. शिक्षक समर्पित आहेत. वर्ग हास्य आणि शिक्षणाने भरले आहेत.
ही शाळा काश्मीरमधील पुनरुत्थान, बदल आणि शैक्षणिक पुनर्जननाचे प्रतीक बनली आहे. हा बदल शबनम यांच्यामुळे घडला. गुंडबाल कालुसाची ही मुलगी हार मानायला तयार नव्हती.
शबनम यांची कहाणी बांदीपोरा किंवा काश्मीरपुरती मर्यादित नाही. ती देशभरातील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना परिषदांमध्ये बोलण्यासाठी, शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नेतृत्वाची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणींना प्रेरित करण्यासाठी आमंत्रित केले जाते.
शबनम अभिमानाने सांगतात, “मी नेहमी म्हणते, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जिद्दीने काम केले तर तुम्हाला यश नक्की मिळेल."
शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन इमारती आणि सुविधांवर होत असताना शबनम कौसर आणि एजीएस बांदीपोराची कहाणी शिक्षणाचा खरा अर्थ सांगते.
शाळेच्या किल्ल्या हातात घेऊन राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा शबनम यांचा प्रवास एका व्यक्तीच्या इच्छाशक्तीची परिवर्तनशील ताकद दाखवतो. काश्मीरच्या हृदयात त्या केवळ प्राचार्या नाहीत, तर बदलाची मुख्य शक्ती आहेत.