भारतातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनचा व्यावसायिक प्रवास आजपासून (२२ जानेवारी) अधिकृतपणे सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जानेवारी रोजी या गाडीला हिरवा कंदील दाखवला होता. कामाख्या ते हावडा या मार्गावर धावणाऱ्या या सेमी-हायस्पीड ट्रेनला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, बुकिंग सुरू झाल्यापासून काही तासांतच सर्व तिकिटे विकली गेली आहेत. ही ट्रेन १६ डब्यांची असून यात थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी असे तीन श्रेणीतील प्रवास उपलब्ध आहेत.
तुम्ही या ट्रेनने प्रवास करणार असाल, तर रेल्वेने जारी केलेले ५ महत्त्वाचे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, या ट्रेनमध्ये फक्त 'कन्फर्म' तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल. ज्या प्रवाशांकडे आरएसी (RAC), वेटिंग किंवा अंशतः कन्फर्म तिकीट आहे, त्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जाणार नाही. गाडी क्रमांक २७५७६ कामाख्या येथून संध्याकाळी १८:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:१५ वाजता हावडा येथे पोहोचेल. हा १४ तासांचा प्रवास असेल.
तिकीट रद्द करण्याच्या नियमांबाबतही रेल्वेने कडक धोरण अवलंबले आहे. जर तुम्ही प्रवासाच्या ७२ तास आधी तिकीट रद्द केलं, तर २५ टक्के रक्कम कापली जाईल. ७२ तास ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास ५० टक्के रक्कम कापली जाईल. मात्र, प्रवासाला ८ तासांपेक्षा कमी वेळ उरला असताना तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा (Refund) मिळणार नाही. या प्रवासात प्रवाशांना रेल्वे नीरची बाटली आणि वर्तमानपत्र मोफत दिले जाईल, तसेच जेवणामध्ये बंगाली आणि आसामी खाद्यपदार्थांचा समावेश असेल.
सामानाबाबत जुनेच नियम लागू असतील. फर्स्ट एसीमधील प्रवासी ७० किलो, सेकंड एसीमधील ५० किलो आणि थर्ड एसीमधील प्रवासी ४० किलोपर्यंत सामान मोफत नेऊ शकतात. या मर्यादेपेक्षा १०-१५ किलो जादा सामानासाठी दीडपट शुल्क आकारले जाईल, त्यापेक्षा जास्त सामान असल्यास दंड भरावा लागेल. या ट्रेनमध्ये प्रवाशांना उच्च दर्जाचे बेडशीट, उशी आणि ब्लँकेट दिले जाणार असून, प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर करण्यावर रेल्वेने भर दिला आहे.