भारत-घाना संबंधांचा नवा अध्याय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत घानाचे अध्यक्ष जॉन द्रमानी महामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत घानाचे अध्यक्ष जॉन द्रमानी महामा

 

भारत आणि घाना या देशांनी आज द्विपक्षीय संबंधांचा दर्जा व्यापक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा घानाचा केवळ भागीदार देश नाही, तर या देशाच्या विकासाच्या प्रवासातील साथीदार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

पंतप्रधान मोदी हे घाना देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज घानाचे अध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत व्यापक भागीदारीबाबतचा निर्णय जाहीर केला. आगामी पाच वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले असल्याचे मोदींनी सांगितले. मोदी आणि महामा यांच्या उपस्थितीत संस्कृती आणि पारंपरिक औषधविज्ञान क्षेत्राशी संबंधित चार करार करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, "घाना विकासाच्या मार्गावर असून त्यांच्या या प्रवासात भारत हा केवळ भागीदार नाही, तर सहप्रवासी आहे. भारतीय कंपन्यांनी घानामधील सुमारे ९०० प्रकल्पांमध्ये दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. वित्ततंत्रज्ञान क्षेत्रात आम्ही आमच्या अनुभवाचा फायदा घानाल देण्यास तयार आहोत. तसेच, खनिज संशोधनातही आम्ही त्यांना सहकार्य करू." 

दहशतवादाविरोधातील लढाईत एकमेकांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेताना सैनिकांना प्रशिक्षण, सागरी सुरक्षा, संरक्षण साहित्य पुरवठा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांत मदत करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे. मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात ते घानामध्ये आले आहेत. घाना हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश असून घानाची सर्वाधिक निर्यात भारतात होते.

मोदींना राष्ट्रीय सन्मान
पंतप्रधान मोदींना 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा राष्ट्रीय सन्मान बहाल करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रभावी नेतृत्व केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. हा सन्मान १४० कोटी भारतीयांतर्फे स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. तसेच, भारत-घाना मैत्री अधिक दृढ करण्यासाठी सोपविलेली ही जबाबदारीही आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

घानाच्या संसदेतही भाषण
पंतप्रधान मोदी यांनी घानाच्या संसदेलाही संबोधित केले. "जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत हा जगासाठी शक्तीचा एक स्रोत आहे. सशक्त भारत हा स्थिर आणि समृद्ध जगासाठी योगदान देईल. भारत ही सर्वांत वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून लवकरच आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनू," असे मोदी म्हणाले. दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेली जागतिक रचना वेगाने बदलत असून जागतिक संस्थांमध्येही त्यानुसार बदल घडून येणे आवश्यक आहे, असेही मोदींनी ठामपणे सांगितले.