भारताचे मध्य आशियात मोठे पाऊल, कझाकस्तानसोबत संरक्षण सहकार्य वाढणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत आणि कझाकस्तानने आपले द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि लष्करी संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कझाकस्तानचे संरक्षण मंत्री कर्नल जनरल रुस्लान झाक्सिलिकोव्ह यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळस्तरीय बैठकीत यावर सहमती झाली.

कझाकस्तानचे संरक्षण मंत्री सध्या भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी मानेकशॉ सेंटर येथे त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

या बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रशिक्षण, क्षमता बांधणी, संयुक्त लष्करी सराव आणि संरक्षण औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. दोन्ही देशांमधील 'KAZIND' हा वार्षिक संयुक्त लष्करी सराव हे या दृढ संबंधांचे उत्तम उदाहरण असल्याचे दोन्ही बाजूंनी अधोरेखित केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि कझाकस्तानमधील धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व विषद केले. मध्य आशियामध्ये कझाकस्तान हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे ते म्हणाले. दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्याच्या नवीन संधी शोधण्यावर आणि संबंध अधिक दृढ करण्यावर सहमती दर्शवली. भारताकडून कझाकस्तानला अत्याधुनिक संरक्षण उपकरणे खरेदी करण्याच्या शक्यतेवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.