"भारताने रशियाकडून तेल आयात करण्यास अमेरिकेचेच प्रोत्साहन होते. खुद्द अमेरिका-युरोपचाही रशियाशी व्यापार सुरू आहे. असे असताना भारताला लक्ष्य करण्याचा प्रकार अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या व्यापार हिताचे संरक्षण करण्यासाठी कटिवद्ध आहे," अशा सडेतोड शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे.
भारतावर आकारलेले २५ टक्के शुल्क व रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीबद्दल भारतावर दंड आकारण्याची दिलेली धमकी यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आणि ट्रम्प प्रशासनाकडून सातत्याने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावणारे निवेदन रात्री उशिरा जारी केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युक्रेनमधील संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून सुरू केलेल्या तेल आयाती संदर्भातील अमेरिका व युरोपकडून भारतावर होत असलेली टीका अनुचित आहे. युक्रेन संघर्षानंतर पारंपरिक पुरवठा युरोपकडे वळवण्यात आला, त्यावेळी भारताने रशियाकडून तेल आयात करण्याचा निर्णय घेतला. याचे कारण केवळ ऊर्जा गरजांची पूर्तता नसून, देशातील ग्राहकांना परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. विशेष म्हणजे, संघर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्वतः अमेरिकेनेच जागतिक ऊर्जा बाजारातील स्थैर्य राखण्यासाठी भारताला रशियाकडून तेल घेण्यास प्रोत्साहन दिले होते.
भारताची ही भूमिका केवळ आर्थिक अनुषंगाने नव्हे तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक होती. भारतावर टीका करणाऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी स्वतः मात्र रशियाशी मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू ठेवला आहे, याकडे लक्ष वेधताना जयस्वाल यांनी युरोपीय महासंघाच्या व्यापार आकडेवारीचाही दाखला दिला. २०२४ मध्ये युरोपीय महासंघाचा रशियाशी ६७.५ अब्ज युरोचा द्विपक्षीय व्यापार होता. याव्यतिरिक्त, २०२३ मध्ये त्यांचा सेवांमध्ये १७.२ अब्ज युरोचा व्यापार होता. त्या वर्षी किंवा त्यानंतर रशियासोबत भारताच्या एकूण व्यापारापेक्षा हा व्यापार लक्षणीयरीत्या जास्त आहे. २०२४ मध्ये युरोपची नैसर्गिक वायूची आयात विक्रमी १६.५ दशलक्ष टनांवर पोहोचली, जी २०२२ मध्ये १५.२१ दशलक्ष टनांच्या मागील विक्रमापेक्षा जास्त आहे. युरोप-रशिया व्यापार केवळ तेलपुरता मर्यादित नाही. त्यामध्ये विविध क्षेत्रांचा समावेश असल्याचे प्रवक्त्यांनी अधोरेखित केले.
लक्ष्य करणे अन्याय्यकारक
खुद्द अमेरिकादेखील रशियाकडून त्यांच्या अणुउद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, ईव्ही उद्योगासाठी पॅलेडियम, खते तसेच रसायने आयात करते. या पार्श्वभूमीवर, भारताला लक्ष्य करणे अन्याव्यकारक आणि अवास्तव आहे. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी उपाययोजना करेल, बाचा ठाम पुनरुच्चार परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात करण्यात आला आहे.