सय्यद नसरुद्दीन चिश्ती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांना फेटा बांधताना.
देशभरातील प्रमुख दर्ग्याचे प्रतिनिधी असलेल्या शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ काल १८ मे ला केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन काउन्सिलचे अध्यक्ष आणि अजमेर दर्ग्याचे सज्जादानशीन सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांनी केले. शिष्टमंडळाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री किरेन रिजिजू, आणि कायदा आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेऊन पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दहशतवादविरोधी कारवाईचे कौतुक केले. या शिष्टमंडळात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांचाही समावेश होता.
या शिष्टमंडळाचा मुख्य उद्देश २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणे आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दिलेल्या कठोर प्रत्युत्तराला पाठिंबा देणे हा होता. शहजाद पुनावाला यांनी पत्रकारांना सांगितले, “सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ देशाच्या उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा सर्व प्रमुख दर्गांचे प्रतिनिधित्व करते. पहलगाम येथील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ला हा मानवतेवर आणि भारतीयत्वावर हल्ला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताच्या लष्करी सामर्थ्याची प्रचिती दिली.”
शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलता धोरणाचे कौतुक केले. पुनावाला यांनी पुढे सांगितले, “केंद्र सरकारच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीने दहशतवादाला गोळीचा जवाब गोळीने देण्याची नवी नीती स्थापित केली आहे.”
किरेन रिजिजू यांनी या भेटीसंदर्भात X वर पोस्ट करत माहिती दिली. ते म्हणाले, “देशभरातील सुफी आणि दर्गाह प्रमुखांचे शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरसाठी कृतज्ञता आणि पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आले होते. या शिष्टमंडळाने भारतीय सशस्त्र दल आणि सरकारला दहशतवादविरोधी लढ्यात सर्व मंचांवर पाठिंबा देण्याचा संकल्प केला. ‘आता घरात घुसून दहशतवाद्यांना मारू’ हा नवा सामान्य नियम आहे. आमच्या शूर जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट करून प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे.”
अर्जुन मेघवाल यांनीही X वर लिहिले, “सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ऑपरेशन सिंदूरसाठी सशस्त्र दल आणि सरकारबद्दल समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. या नव्या सामान्य धोरणाने पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा नायनाट करून प्रत्येक भारतीयाचा मान उंचावला आहे.”
ऑल इंडिया सुफी सज्जादानशीन काउन्सिलची भूमिका
सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांनी यापूर्वी १२ मे ला ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “ आमच्या सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले याचा देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. भारत एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र आहे. परंतु दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.”
नसरुद्दीन चिश्तीनेतृत्वाखालील शिष्टमंडळात अजमेर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, आणि इतर ठिकाणच्या दरगाहांचे प्रमुख आणि मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधी सामील होते. या शिष्टमंडळाने दहशतवादाविरुद्ध राष्ट्रीय एकजुटीचा संदेश दिला आणि भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर करताना ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा जाहीर केला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter