पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२१ जानेवारी) अवैध घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सांगत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. "अशा लोकांना शोधून काढून त्यांच्या देशात परत पाठवणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या संघटन पर्वानिमित्त पक्ष मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. "भारत अवैध घुसखोरांना आपल्या जनतेला लुटण्याची आणि गरीबांच्या हक्काच्या सेवा बळकावण्याची परवानगी कधीही देणार नाही," असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावरून पाश्चिमात्य देशांचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले, "काही श्रीमंत आणि शक्तिशाली देश स्वतःला जगाचे मालक समजतात. ते सुद्धा अवैध घुसखोरांना शोधून परत पाठवत आहेत आणि त्यांच्या या कृतीवर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही." पुढे ते म्हणाले, "हे देश लोकशाहीचा झेंडा फडकवतात, तरीही अवैध घुसखोरांना कोणीही स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांना शोधणे आणि परत पाठवणे ही काळाची गरज आहे."
काही राजकीय पक्ष व्होट बँकेच्या राजकारणासाठी घुसखोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला. "अशा पक्षांचा बुरखा फाडून जनतेसमोर त्यांचे सत्य आणणे गरजेचे आहे. घुसखोरांना अभय देणाऱ्या या प्रवृत्तींचा बीमोड करावा लागेल," असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या भाषणात पंतप्रधानांनी अर्बन नक्षल या विषयावरही भाष्य केले. "हे गट आपला प्रभाव जागतिक स्तरावर वाढवत आहेत. जर एखाद्या व्यक्तीने मोदींबद्दल वर्षातून एकदा-दोनदा काही सकारात्मक लिहिले किंवा टीव्हीवर चांगले बोलले, तर काही पत्रकार आणि लोकांचा गट त्यांना इतका त्रास देतो की त्यांना समाजात बहिष्कृत केले जाते. ही अर्बन नक्षलांची कार्यपद्धती आहे," असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
भाजपला अनेक वर्षे राजकीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागला, पण आता देश या कारस्थानांना ओळखू लागला आहे. "अर्बन नक्षल सतत भारताचे नुकसान करण्यासाठी टपलेले असतात. आम्हाला आमच्या संघटनेच्या आणि विचारसरणीच्या जोरावर या युतीचा पराभव करावा लागेल," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.