भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या सोशल मीडिया आणि काही माध्यमांतील वृत्तांना "खोटे आणि दिशाभूल करणारे" ठरवत त्यांचे खंडन केले आहे. नियंत्रण रेषेवर अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.
लष्कराने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पूंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे दावे काही मीडिया आणि सोशल मीडिया रिपोर्ट्समध्ये केले जात आहेत. हे स्पष्ट करण्यात येते की, नियंत्रण रेषेवर कोणतेही शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही."
विशेष म्हणजे, कलम ३७० हटवण्याच्या वर्षपूर्तीदिनी (५ ऑगस्ट) हे खोटे दावे सोशल मीडियावर वेगाने पसरवण्यात आले होते.
एकीकडे लष्कर अफवांचे खंडन करत असताना, दुसरीकडे दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम पाचव्या दिवशीही सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी या दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ही संयुक्त कारवाई भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ (CRPF) आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) द्वारे राबवली जात आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले: "ऑपरेशन अखल, कुलगाम: रात्रभर मधूनमधून तीव्र गोळीबार सुरू होता. सतर्क जवानांनी संयमित प्रत्युत्तर देत वेढा आणखी मजबूत केला. आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला असून, ऑपरेशन सुरू आहे."
यापूर्वी, ३० जुलै रोजी पूंछ सेक्टरमध्ये 'व्हाइट नाइट कॉर्प्स'ने राबवलेल्या ‘ऑपरेशन शिवशक्ती’मध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. या यशस्वी कारवाईसाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या समन्वित गुप्तचर माहितीची मदत झाली होती.