परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन सैन्यात भारतीय नागरिकांची भरती होत असल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केला आहे. मॉस्कोला ही प्रथा थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, रशियन सैन्यात सामील होण्याचे धोके आणि जोखीम भारताने वारंवार अधोरेखित केली आहेत. भारतीय नागरिकांना याबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, अलीकडेच काही भारतीय नागरिकांची रशियन सैन्यात भरती झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या एका वर्षात सरकारने अनेकदा या कृतीतील धोके स्पष्ट केले आणि नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, भारताने दिल्ली आणि मॉस्को येथील रशियन अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. ही प्रथा थांबवावी आणि भारतीय नागरिकांना मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांशीही सरकार संपर्कात आहे. दोन भारतीय तरुणांना बांधकाम क्षेत्रात नोकरीच्या आमिषाने रशियाला नेले गेले, पण त्यांना प्रत्यक्षात युद्धभूमीवर पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.
गेल्या सहा महिन्यांत हे दोघे विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर रशियाला गेले होते. एका एजंटने त्यांना बांधकाम क्षेत्रात नोकरी देण्याचे वचन दिले होते, पण त्यांची फसवणूक करून थेट युद्धभूमीवर पाठवले गेले, असे त्यांचा आरोप आहे.