पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने (ISI) दिल्लीतील एक ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील प्रसिद्ध ढाबा आणि हरियाणामधील एका लष्करी तळावर हल्ला करण्याचा कट रचला होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 'गँग बस्ट ऑपरेशन २.०' अंतर्गत विविध राज्यांतून ९ संशयित अतिरेक्यांना अटक केल्यानंतर चौकशीतून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. हे सर्व जण 'शहजाद भट्टी' मॉड्यूलशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने दिल्लीतील एका ऐतिहासिक मंदिराची पाहणी (रेकी) केली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने या मंदिराच्या परिसराची छायाचित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानात बसलेल्या आपल्या हस्तकांना (Handlers) पाठवली होती. या मंदिरात तैनात असलेले पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. गोळीबार करून भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याची त्यांची योजना होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींना दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एका लोकप्रिय ढाब्यावर ग्रेनेड हल्ला करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या ढाब्यावर दररोज हजारो लोकांची ये-जा असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवून आणण्याचा त्यांचा हेतू होता. याशिवाय, त्यांनी हरियाणामधील हिसार येथील एका लष्करी तळाचेही सर्वेक्षण केले होते आणि त्या परिसराचे व्हिडिओ सीमेपलीकडील हस्तकांसोबत शेअर केले होते. उत्तर प्रदेशातील काही पोलीस ठाणीही त्यांच्या 'टार्गेट लिस्ट'वर असल्याचे तपासात उघड झाले आहे.