भारताला वेध मंगळावरील वसाहतींचे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मंगळाच्या पृष्ठभागावर श्री-डी प्रिंट केलेली निवासस्थाने उभारणे आणि पुढील चार दशकांमध्ये मंगळावर मानव उत्तरविण्याच्या दृष्टीने भारताच्या मोहिमा सुरू होणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) भविष्यातील मोहिमांचा आराखडा तयार केला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी हा आराखडा जाहीर करण्यात आला. अन्य अनेक योजनांपैकी १५० टन पेलोड घेऊन जाऊ शकणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचा 'इस्रो'चा प्रयत्न सुरू आहे. 

सध्याच्या प्रक्षेपकांपैकी 'जीएसएलव्ही मार्क ३' हे प्रक्षेपक भूस्थिर कक्षेपर्यंत चार टन आणि पृथ्वीनजिकच्या कक्षेपर्यंत ८ टन पेलोड घेऊन जाऊ शकते. याशिवाय, पृथ्वीनजिकच्या कक्षेपर्यंत ८० टन आणि चंद्राच्या कक्षेपर्यंत २७टन पेलोड नेऊ शकेल, असे 'लुनार मॉडयूल' प्रक्षेपक (एलएमएलव्ही) विकसित करण्यासाठीही 'इस्रो'चे संशोधन सुरू आहे. हे प्रक्षेपक ४० मजली इमारतीएवढे म्हणजे ११९ मीटर उंचीचे आहे. ते २०३५पर्यंत सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चांद्रमोहिमांमध्ये 'एलएमएलव्ही'चा वापर करता येणे शक्य आहे.

दहा वर्षांत अवकाश स्थानक
पुढील दहा वर्षांत म्हणजे २०३५ पर्यंत भारतीय अवकाश स्थानक बांधण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३मध्ये जाहीर केले आहे. त्याशिवाय, २०४० पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरला पाहिजे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. यातून, अवकाश क्षेत्रातील भारताच्या दीर्घकालीन योजना स्पष्ट होता. काही दिवसांपूर्वी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय मोहिमेत सहभाग घेतला आणि अवकाशात जाणारे दुसरे भारतीय ठरले. नियोजित गगनयान मोहिमेच्या दृष्टीने ही मोहीमही महत्त्वाची होती, असे मानले जाते.

भारताच्या भविष्यातील मोहिमा
१भारतीय अंतराळवीरांसाठी २०४७ पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर स्थानक तयार करणे
२ चंद्राच्या पृष्ठभागावर खनिजे व अन्य साधनसंपत्तीचा शोध घेणे
३ भविष्यातील मोठ्या मोहिमांसाठी चंद्रावर इंधनाचा साठा तयार करणे
४ अंतराळवीरांना चंद्रावर राहता येण्यासाठी पोषक स्थिती निर्माण करणे