दिव्यांची रोषणाई, देखण्या रांगोळ्या, फराळांचा घमघमाट आणि पारंपरिक वेशात सुरू असणारी सर्वांची लगबग. दरवर्षी दिवाळीचे हे मांगल्याचे वातावरण शहराशहरात दिसते. यंदा मात्र राजारामपुरीतील एका झाडाखालील साधा, परंतु मनाला भिडणारा स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. या छोटेखानी स्टॉलवर दिसतात काही रंगीबेरंगी पणत्या, अगरबत्त्यांचे पुडे, रांगोळीचे रंग, लक्ष्मीच्या पाऊलखुणा, हळदीकुंकू, मेवामिठाई, मेहंदीचे कोन आणि पूजेचे साहित्य. पाहता एक सामान्य सणावळीचा स्टॉल परंतु त्यामागे कहाणी आहे ५५ वर्षीय परवीन शेख चाचींनी जपलेल्या सौहार्दाची.
हा स्टॉल दिवाळीच्या खरेदीपुरता मर्यादित नसून, तो कोल्हापूरच्या सामाजिक एकात्मतेचा वारसा ठळकपणे दर्शवतो. दिवाळी आली की राजाराम गार्डनसमोर एका झाडाच्या सावलीत परवीन शेख साहित्याचा छोटासा संसार थाटून बसतात. त्यांच्या स्टॉलवर लक्ष्मीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य मांडलेले असते. हे सर्व साहित्य विकताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच श्रद्धा आणि आपुलकी दिसते. त्यांच्यासाठी हा केवळ एक व्यवसाय नाही तर दिवाळी साजरी करण्याची एक संधीच.
परवीन चाचींच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत खडतर राहिलाय. मुले लहान असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या दुःखातून सावरत असतानाच काही काळाने त्यांच्या सर्वात लहान मुलानेही जगाचा निरोप घेतला. एकाकी आणि निराधार झालेल्या परवीन चाचींवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण त्या खचल्या नाहीत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. आजही त्यांचे जीवन रोजच्या कष्टावरच अवलंबून आहे. दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या काळात त्या हा हंगामी व्यवसाय करतात. यातून मिळणारे चार पैसे त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतात.
अनेकदा खरेदीच्या गडबडीत काही ग्राहक पूजेच्या साहित्याबद्दल संभ्रमात पडतात. दिवाळीच्या कोणत्या दिवशी कोणती पूजा करायची आणि त्यासाठी काय साहित्य लागते हे विसरतात. अशावेळी परवीन चाची पुढे येतात. त्या विक्रेत्या आणि जाणकार अशा दोन्ही भूमिका बजावतात. “ताई, लक्ष्मी पूजनाला हा पुडा घ्या. त्यात हळदी-कुंकू, बत्तासे, अगरबत्ती आणि लक्ष्मीची पाऊले आहेत. पाडव्याला पणत्यांसाठी हे तेल ठेवा," असे त्या ग्राहकांना आत्मविश्वासाने सांगतात.
एक मुस्लिम महिला हिंदू धर्मातील सणांच्या प्रथा-परंपरा इतक्या अचूकपणे सांगते हे पाहून ग्राहकही थक्क होतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आदराचा भाव एकाच वेळी उमटतना दिसतो. परवीन चाचींसाठी हा व्यवसाय फक्त पोट भरण्याचेच नाही. यातून त्या एकमेकांच्या संस्कृतीचा उलगडा देखील करतात. याविषयी परवीन म्हणतात, "मी वर्षानुवर्षे हेच काम करतेय. त्यामुळं लोकांना काय लागतं, काय आवडतं, सगळं समजलंय आता. त्यामुळं हिंदू काय अन् मुस्लीम काय शेवटी एकत्र राहिल्यानेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती टिकून राहील."
त्या पुढे म्हणतात, "सणासुदीच्या काळात मला दिवसाला १ हजारचा नफा मिळतो. इथं खरेदी करताना कुणी बघत नाही मी कोणत्या धर्माची आहे. मला असं वाटत दोन वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांनी एकमेकांच्या प्रथा-परंपरांचा आदर केला, तर आपले पोटही भरते आणि मन सुद्धा." परवीन यांचे हे शब्द त्यांच्या कृतीतून तंतोतंत दिसून येतात.
हिंदू दुकानातूनच खरेदी करण्याचा फतवा काही राजकारण्यांकडून निघत असताना देखील परवीन यांच्या स्टॉलवर ग्राहकांचा ओघ दिसून येतो. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना परवीन चाचींकडे खरेदीला येणारे ग्राहक आशेचा किरण बनून समोर येतात.
कोल्हापूर शहराला सामाजिक सुधारणांचा आणि सर्वधर्म समभावाचा मोठा वारसा लाभला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेली ही समतेची भावना आजही इथल्या मातीत खोलवर रुजलेली आहे. परवीन चाची आणि त्यांच्या स्टॉलवर येणारे ग्राहक हे त्याच प्रगतिशील विचारांचे प्रतिबिंब आहेत.
दिवाळी हा दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. या काळात प्रकाश केवळ दारातच नाही तर आपल्या मनातही सौहार्दाचा दिवा तेवत राहावा लागतो. परवीन चाचींचा हा छोटासा स्टॉल याच प्रकाशाचे प्रतीक आहे. त्या माणुसकीचा, सहिष्णुतेचा आणि निखळ प्रेमाचा प्रकाश आपल्या सभोवती पसरवत आहेत.