नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या सुरक्षा दलांना आज (बुधवार) आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात, CPI (Maoist) या प्रतिबंधित संघटनेच्या दोन मोठ्या कमांडरसह तब्बल ५० नक्षलवाद्यांनी मोठ्या शस्त्रसाठ्यासह आत्मसमर्पण केले आहे. यात ३२ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. ही केवळ पहिली तुकडी असून,आज विजापूर जिल्ह्यात आणखी १२० नक्षलवादी शरण येण्याची शक्यता असल्याने, नक्षलवादी चळवळ मुळापासून उखडली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी, कांकेर जिल्ह्यातील कोयलीबेडा येथील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) ४० व्या बटालियनच्या कामतेरा कॅम्पमध्ये हा ऐतिहासिक शरणागतीचा कार्यक्रम पार पडला.
राजमन मंडावी आणि राजू सलाम या दोन विभागीय समिती सदस्यांच्या (SZCM) नेतृत्वाखाली आलेल्या या गटात, ५ विभागीय समिती सदस्य (DVCM) दर्जाचे मोठे कमांडरही होते. यात प्रसाद तडामी, हिरालाल कोमरा, जुगनू कोवाची, नरसिंग नेताम आणि राजमन मंडावीची पत्नी नंदे यांचा समावेश आहे. या गटाने ७ AK-47 रायफल्स, १ INSAS LMG, २ एसएलआर, ४ इन्सास रायफल्स आणि १ स्टेनगन यांसारख्या ३९ अत्याधुनिक शस्त्रांसह शरणागती पत्करली.
सुरक्षा दलाच्या सूत्रांनुसार, माडच्या उत्तरेकडील भागातून झालेली ही शरणागतीची पहिली मोठी तुकडी आहे. उद्या सकाळपर्यंत, माडच्या दक्षिणेकडील विजापूर जिल्ह्यातील भैरमगड परिसरात आणखी १२० नक्षलवादी शरण येण्याची अपेक्षा आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने आणि वरिष्ठ कमांडरनी शरणागती पत्करल्याने, नक्षलवादी चळवळीचे कंबरडे मोडले आहे.