"जागतिक व्यवस्था अपयशी ठरत आहे," ब्रिक्स परिषदेत जयशंकर यांचा जगाला आरसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

"आजची जगाची स्थिती ही खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत आपण कोरोना महामारी, युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील मोठे संघर्ष आणि हवामान बदलाचे विनाशकारी परिणाम पाहिले आहेत. या आव्हानांना तोंड देताना, बहुपक्षीय व्यवस्था जगाला अपयशी ठरवत असल्याचे दिसत आहे," अशा कठोर शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेवर टीका केली.

सोमवारी झालेल्या व्हर्च्युअल 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व करताना ते बोलत होते.

'X' वरील आपल्या पोस्टमध्ये एस. जयशंकर म्हणाले, "भारताचा संदेश स्पष्ट होता की, ब्रिक्सने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी काम केले पाहिजे, सुरू असलेल्या संघर्षांचा 'ग्लोबल साऊथ'वर (विकसनशील देश) होणारा परिणाम हाताळला पाहिजे आणि बहुपक्षीय सुधारणांना सक्रियपणे पाठिंबा दिला पाहिजे."

आपल्या भाषणात एस. जयशंकर यांनी सांगितले की, "आज लक्ष आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि जागतिक व्यवस्था स्थिर करण्यावर आहे. पण सुरू असलेल्या संघर्षांकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण त्याचा थेट विकास आणि पुरवठा साखळीवर परिणाम होतो."

जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक लवचिक, विश्वासार्ह आणि लहान पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. व्यापारावर बोलताना ते म्हणाले की, "वाढणारे अडथळे आणि गुंतागुंतीचे व्यवहार मदतीचे ठरणार नाहीत. व्यापाराला गैर-व्यापारी बाबींशी जोडणेही चुकीचे आहे."

एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची जोरदार मागणी केली. ते म्हणाले, "महत्त्वाच्या मुद्द्यांवर, आपण दुर्दैवाने पाहिले आहे की मतभेदांमुळे समान तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या अनुभवांमुळे संयुक्त राष्ट्रात आणि विशेषतः सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची गरज अधिकच तातडीची बनली आहे."

यासोबतच, हवामान बदल आणि हवामान न्यायासारखे मुद्दे जागतिक प्राधान्यक्रमातून खाली जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.