परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर १३ जुलैदरम्यान शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी चीनला भेट देणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (४ जुलै) सूत्रांनी दिली. २०२० मध्ये पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्करी तणाव निर्माण झाल्याने दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण झाले. जयशंकर यांची त्या घटनेनंतरची चीनमधील हा पहिला दौरा असणार आहे.
चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी हे या महिन्यात भारतात येऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी सीमा वादाबाबत विशेष प्रतिनिधी (एसआर) संवादाच्या चौकटीत नवीन चर्चा घडवून आणू शकतात, अशी माहिती आहे. डिसेंबरमध्ये डोवाल यांनी बीजिंगला भेट दिली आणि वांग यांच्याशी एसआर चर्चा केली होती. गेल्या महिन्यात डोवाल यांनी एससीओ सदस्य देशांच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी चीनला भेट दिली होती.
सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री जयशंकर बीजिंगला वांग यांच्याशी चर्चेसाठी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते १४ आणि १५ जुलैला तियानजिन येथे होणाऱ्या एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेसाठी जातील. जयशंकर यांची ही भेट संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तीन आठवड्यांपूर्वी चिनी बंदर शहर किंगदाओ येथे एससीओ संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेसाठी केलेल्या भेटीनंतर होत आहे.
चीन सध्या एससीओचे अध्यक्षपद भूषवत आहे आणि त्याच निमित्ताने तो या संघटनेच्या बैठका आयोजित करत आहे. पूर्व लडाखमधील लष्करी तणाव मे २०२० मध्ये सुरू झाला. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीमुळे दोन्ही शेजारी देशांमधील संबंध गंभीरपणे बिघडले. २१ ऑक्टोबरला डेमचोक आणि देपसांग या शेवटच्या दोन तणावपूर्ण ठिकाणांहून माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हा तणाव प्रभावीपणे संपला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात २३ ऑक्टोबरला कझान येथे झालेल्या बैठकीत एसआर यंत्रणा आणि इतर संवाद स्वरूप पुनरुज्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोदी-शी भेट दोन दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांनी डेमचोक आणि देपसांगसाठी माघारीचा करार निश्चित केल्यानंतर झाली. गेल्या काही महिन्यांत भारत आणि चीन यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी जवळपास पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू केली.