शनिवारी रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसात राजबागमधील जोधघाटी गावात ढगफुटी झाली. त्याचप्रमाणे, जांगलोट परिसरात दरड कोसळली. ढगफुटीमुळे जोघघाटीत पाच जणांचा मृत्यू झाला, त्याचप्रमाणे रस्ते व घरांचेही मोठे नुकसान झाले. पुरातील चिखल व गाळात घरे गाडली गेली. जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाचेही नुकसान झाले.
प्रशासनाने नागरिकांना नदी, तलावांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे बहुतेक नदी, तलाव व इतर जलस्रोत ओसंडून वाहत आहेत. उजह नदी घोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे. जांगलोट परिसरात दरड कोसळल्याने आणखी दोघांना प्राण गमवावे लागले.
पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून लष्कराने बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरही तैनात केले आहे. लष्कराने 'ध्रुव' हेलिकॉप्टरमधून जोधघाटीतून १५ जणांची सुटका करत त्यांना उपचारासाठी पंजाबमधील पठाणकोट येथील रुग्णालयात दाखल केले.
कथुआचे उपायुक्त राजेश शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून बचावकार्याचा आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उपायुक्त राजेश शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून बचावकार्याचा आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिस्थितीचा आढावा घेत म्हटले आहे की, "ढगफुटीनंतर जम्मू-काश्मिरचे नायाब राज्यपाल व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. बचावकार्यात स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी 'एनडीआरएफ'ची पथके मदत करत आहेत."
कथुआचे उपायुक्त राजेश शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, "मुसळधार पावसामुळे कथुआत जीवित व वित्तहानी झाली. ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू झाला, इतर सात जण जखमी झाले. जांगलोटमध्येही दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या परिसरात जीवनावश्यक वस्तू पोचविल्या जात आहेत. हवाईमार्गे मदत पोचविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत."
किश्तवाडमध्ये बेपत्तांचा शोध सुरूच
किश्तवाडमधील चशोट गावात झालेल्या ढगफुटीनंतर बेपत्ता असलेल्यांचा शोध रविवारी, चौथ्या दिवशीही सुरूच होता. येथील ढगफुटीत ६० जणांचा मृत्यू झाला असून ७५ जण बेपत्ता आहेत. या परिसरात एनडीआरएफच्या मदतीने मदत व बचावकार्य राबविले जात असून, चशोट गावातील ढिगारे, दगड हटविण्याचे काम रविवारअखेर पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.