आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामन्याच्या पार्श्वभूमीवर, 'जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनने' (JKSA) देशभरात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांनी या सामन्याकडे केवळ एक खेळ म्हणून पाहावे आणि सोशल मीडियावर अशा कोणत्याही पोस्ट करण्यापासून दूर राहावे, ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात, असे आवाहन संघटनेने केले आहे.
संघटनेचे राष्ट्रीय संयोजक नासिर खुएहामी यांनी यावर भर दिला की, विद्यार्थ्यांनी या सामन्याला केवळ एक क्रीडा स्पर्धा म्हणून पाहावे आणि अशा कोणत्याही कृती टाळाव्यात, ज्यामुळे अनावश्यक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. "आम्ही देशभरात शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे, कारण याच मुख्य उद्देशाने ते आपल्या घरापासून दूर आले आहेत," असे ते म्हणाले.
यावेळी संघटनेने विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाने केलेल्या प्रचंड त्यागाचीही आठवण करून दिली; "ज्या वडिलांनी अथक परिश्रम घेतले आहेत, ज्या भावांनी कर्ज काढले आहे, ज्या बहिणींनी दागिने विकले आहेत आणि ज्या माता त्यांच्या कल्याणासाठी अविरत प्रार्थना करतात, त्या सर्वांचा विचार करा," असे भावनिक आवाहन करण्यात आले.
नासिर खुएहामी यांनी सांगितले की, "यापूर्वीच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमुळे, डझनभर विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमुळे किंवा वादविवादात अडकल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे, अटक झाली आहे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. अशा घटनांमुळे त्यांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम झाले आहेत."
"आम्ही विद्यार्थ्यांना जोरदार सल्ला देतो की, त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा, वादविवाद किंवा कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सहभागापासून दूर राहावे, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये वाद किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यांनी खऱ्या खिलाडूवृत्तीने खेळाचा आनंद घ्यावा आणि अनावश्यक संघर्षात अडकणे टाळावे," असे संघटनेने म्हटले आहे.
नासिर खुएहामी यांनी भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडलेल्या राजकीय आणि भावनिक बाजूंकडेही लक्ष वेधले आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. "कोणत्याही विशिष्ट संघाला उघडपणे पाठिंबा दिल्याने विद्यार्थी स्वतःला असुरक्षित परीस्थितीत टाकू शकतात. त्यांनी सावधगिरी बाळगणे आणि आपल्या कॅम्पसमध्ये व निवासस्थानी स्वतःचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे," असा सल्ला त्यांनी दिला.
खेळ हे केवळ मनोरंजनापलीकडचे असतात; ते आपल्याला बंधुभाव, शिस्त आणि सलोखा शिकवतात. हा सामना खिलाडूवृत्तीचा उत्सव ठरो, वादाचे कारण नको, असेही ते म्हणाले.
संघटनेने यावर्षी झालेल्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्याचीही आठवण करून दिली. या हल्ल्याने दोन अण्वस्त्रधारी देश युद्धाच्या उंबरठ्यावर आणले होते, ज्यामुळे शांतता प्रक्रिया किती नाजूक आहे, हे दिसून आले. काश्मिरींनी मोठ्या संख्येने पहिलगामच्या पीडितांना पाठिंबा देऊन आणि दहशतवादाचा तीव्र निषेध करूनही, भारतातील अनेक ठिकाणी जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांनाच याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला होता.
या पार्श्वभूमीवर, हा क्रिकेट सामना केवळ खेळाच्या दृष्टिकोनातून पाहिला जाणार नाही, तर त्याला राजकीय, भावनिक आणि राष्ट्रवादी कंगोरेही असतील. त्यामुळे, या संवेदनशील काळात आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शांतता, सावधगिरी आणि सलोखा राखण्याचे आवाहन करत आहोत, असे आवाहन 'जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनने'ने शेवटी केले आहे.