राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींसह मान्यवरांनी कारगिल वीरांना वाहिली आदरांजली

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 14 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली, २६ जुलै

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांच्या जवानांना आदरांजली वाहिली. १९९९ च्या कारगिल युद्धात अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शौर्य गाजवत पाकिस्तानला धूळ चारली होती. याच निमित्ताने देशभरातून त्यांच्या अतुलनीय बलिदानाला अभिवादन केले जात आहे.

१९९९ मध्ये २६ जुलै रोजी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन विजय' यशस्वी झाल्याची घोषणा केली. लडाखमधील कारगिलच्या बर्फाळ शिखरांवर सुमारे तीन महिने चाललेल्या या संघर्षानंतर भारताला विजय मिळाला होता. हा दिवस दरवर्षी 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले, "हा दिवस आपल्या जवानांच्या अदम्य धैर्य, साहस आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे. राष्ट्रासाठी त्यांचे समर्पण आणि सर्वोच्च बलिदान देशातील नागरिकांना नेहमीच प्रेरणा देत राहील." राष्ट्रपती या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडरही आहेत.

शहीदांना आदरांजली आणि गौरव

या निमित्ताने, द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक आणि देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या युद्धात ५०० हून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कारगिल विजय दिवस आपल्याला आपल्या सैनिकांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्याची आठवण करून देतो. देशाच्या सन्मानाचे रक्षण करताना त्यांनी आपले प्राण अर्पण केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली. "कारगिल विजय दिनानिमित्त, आपल्या शूरवीरांना मी मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी सर्वात कठीण परिस्थितीत देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी धैर्य आणि निर्धार दाखवला," असे सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले. कारगिल युद्धातील त्यांचे सर्वोच्च बलिदान हे आपल्या सशस्त्र दलांच्या दृढ निश्चयाची कालातीत आठवण आहे. भारत त्यांच्या सेवेसाठी नेहमीच ऋणी राहील, असे ते म्हणाले. सिंह आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख आणि भविष्यातील आव्हान

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सांगितले की, कारगिल विजय दिवस केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. "आपले शत्रू आपल्या निर्धाराची परीक्षा घेत राहतील. पण कारगिलचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की आपली एकजूट, सज्जता आणि अटूट धैर्य - जे 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे - ते शत्रूच्या विश्वासघात आणि आक्रमकतेवर नेहमीच विजय मिळवेल," असे ते म्हणाले.

जनरल चौहान यांनी म्हटले की, कारगिल विजय दिवस प्रत्येक भारतीयाला आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्य आणि देशभक्तीची आठवण करून देतो, ज्यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी निर्भयपणे लढा दिला, तसेच पाकिस्तानच्या 'विश्वासघाताच्या कटू सत्याची' आठवणही करून देतो. मुजाहिदीनच्या वेशात नियमित सैन्य पाठवून संघर्ष वाढवण्याची पाकिस्तानी सैन्याची चाल त्यांच्या कपटनीतीची स्पष्ट आठवण करून देते, असे ते म्हणाले.

द्रास येथे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी विजयाचे महत्त्व सांगितले. "जेव्हा भारताने हे स्पष्ट केले की कोणत्याही वाईट हेतूंना आपल्या सीमेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, भारताच्या एकतेचे आणि अखंडतेचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही," असे ते म्हणाले. "ही परंपरा कायम ठेवत, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यानही भारतीय सैन्याने त्याच अदम्य धैर्य आणि दृढ निश्चयाने पाकिस्तान-समर्थित दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आणि पाकिस्तानच्या आक्रमक कृत्यांना प्रभावीपणे हाणून पाडून निर्णायक विजय मिळवला," असे ते म्हणाले.