आशा खोसा
काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि संताप भडकवण्यासाठी, भारतीय लष्कराच्या अत्याचाराचा पुरावा म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'निनावी कबरी' (unmarked graves) या बहुतांशी विदेशी, मुख्यत्वे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या आहेत. या दहशतवाद्यांना हिंसाचार वाढवण्यासाठी सीमेपलीकडून पाठवण्यात आले होते.
काश्मीरस्थित 'सेव्ह यूथ सेव्ह फ्युचर फाउंडेशन'ने "सत्य उलगडताना: काश्मीर खोऱ्यातील निनावी आणि अनोळखी कबरींचा एक चिकित्सक अभ्यास" या आपल्या अभ्यासात हे तथ्य मांडले आहे. या फाउंडेशनचे नेतृत्व वजाहत फारूक भट करत आहेत, जे एकेकाळी दगडफेक करणारे होते, पण आता शांतता कार्यकर्ते म्हणून काम करतात. ही संस्था तरुणांच्या मनातील कट्टरतावाद कमी करण्यासाठी आणि काश्मिरी समाजात शांतता व सलोखा वाढवण्यासाठी कार्यरत आहे.
विशेष म्हणजे, याच संस्थेने दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुस्लिम कुटुंबांची माहिती गोळा करण्यातही सहभाग घेतला होता. या स्थानिक लोकांना अनेक वर्षे समाजाने बहिष्कृत केले होते आणि प्रशासनानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. अलीकडेच, सरकारने त्यांच्या दुर्दशेची दखल घेतली आणि दहशतवादाचे बळी ठरलेल्या सुमारे ४०० पीडितांच्या कुटुंबीयांना नोकरीची पत्रे दिली.
हा अहवाल मध्य आणि उत्तर काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा आणि गंदरबल जिल्ह्यांमधील ३७३ कब्रस्ताने आणि ४,०५६ कबरींच्या सहा वर्षांच्या अभ्यासावर आधारित आहे. काश्मीरमधील दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळात, हा पट्टा स्थानिक आणि विदेशी दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) शस्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी आणि परत येण्यासाठी एक प्रमुख घुसखोरीचा मार्ग होता.
या अभ्यासासाठी, काश्मिरी संशोधकांनी कबर खोदणाऱ्यांच्या साक्षी नोंदवल्या, कब्रस्तानांच्या नोंदी, पोलिसांचे एफआयआर, मृत दहशतवाद्यांची कुटुंबे आणि इतर प्रत्यक्षदर्शींकडून माहिती गोळा केली.
अहवालानुसार, या कब्रस्तामांमधील ९१ टक्के कबरी दहशतवाद्यांच्या आहेत – ज्यात २४९३ विदेशी भाडोत्री सैनिक आणि १२०८ स्थानिक दहशतवादी आहेत. केवळ २७६ कबरी अनोळखी किंवा निनावी आहेत आणि या अनोळखी कबरींची डीएनए चाचणी करून मृतांची ओळख पटवावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
"काश्मिरींची एक पिढी ही भावना मनात बाळगून मोठी झाली आहे की, सुरक्षा दलांनी स्थानिकांना अंदाधुंदपणे मारले आणि त्यांच्या कबरी निनावी आहेत," असे या अभ्यासात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. "ते याचा दोष सुरक्षा दलांना आणि भारताला देतात. तीन दशकांच्या संघर्षात जे काही घडले, त्यामागील सत्य जाणून घेण्याचा आमच्या पिढीला हक्क आहे, ज्यात निनावी कबरींचे वास्तवही समाविष्ट आहे."
अहवालात म्हटले आहे की, "जम्मू-काश्मीरमधील निनावी आणि अनोळखी कबरींभोवतीचा विमर्श अनेकदा अशा ध्रुवीकरण झालेल्या कथांनी आकारला गेला आहे, ज्या संघर्षाची संपूर्ण गुंतागुंत पकडण्यात अपयशी ठरतात. इराण, बोस्निया किंवा रवांडासारख्या संघर्षानंतरच्या समाजांमधील सामूहिक कबरींच्या परिस्थितीपेक्षा काश्मीरमधील संदर्भ वेगळा आहे. तिथे, राज्य-प्रणित दडपशाही हे एक निश्चित कारण होते."
"येथे, निनावी किंवा अनोळखी कबरींचे अस्तित्व हे कोणत्याही एका विशिष्ट, पद्धतशीर दडपशाहीच्या धोरणामुळे नाही, तर ते सुरू असलेल्या दहशतवादाच्या, सीमापार दहशतवादाच्या आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या वास्तवाशी खोलवर जोडलेले आहे."
अहवालात असे निदर्शनास आणले आहे की, दहशतवादी, विशेषतः नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करणारे, अनेकदा कोणतीही ओळखपत्र बाळगत नव्हते. काहीवेळा, ते बनावट किंवा सांकेतिक नावे वापरत. सुरक्षा दलांना अनेकदा दफनविधी करण्याशिवाय फारसा पर्याय नसायचा. तथापि, कालांतराने, काही गटांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या कबरींना पद्धतशीर मानवाधिकार उल्लंघनाचे प्रतीक म्हणून सादर केले.
या विमर्शाने केवळ काश्मीरमधील लोकांच्या धारणेवरच प्रभाव टाकला नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदायाचा या संघर्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. "याच कथनाने काश्मीरमध्ये फुटीरतावादी भावना भडकवली आहे आणि आजही तो संघर्ष टिकवून ठेवत आहे."
अहवालात म्हटले आहे की, फुटीरतावादी घटकांनी या कथनाचा वापर सामान्य काश्मिरींमध्ये वैर निर्माण करण्यासाठी केला, ज्यापैकी अनेकांना या संघर्षाच्या खोल गतिशीलतेबद्दल पूर्वी माहिती नव्हती.
पाकिस्तानच्या योजनेतील एका विशिष्ट पद्धतीवर बोट ठेवत, अहवालात म्हटले आहे की, भारतीय सैन्याने ठार मारल्यानंतर, पाकिस्तानने आपल्या त्या 'जिहादीं'ना स्वीकारण्यास नकार दिला, ज्यांना त्यानेच काश्मीरमध्ये आपले छुपे युद्ध लढण्यासाठी पाठवले होते.
अहवालात म्हटले आहे की, आपल्या 'जिहादीं'ना न स्वीकारण्यामागे पाकिस्तान आणि खोऱ्यातील त्यांच्या सहानुभूतीदारांचा (हुर्रियत कॉन्फरन्स) एक जाणीवपूर्वक कट होता. यातून सतत भारतीय लष्कराला दोष देणे आणि सुरक्षा दल 'निष्पाप लोकांना' मारतात, असा एक विमर्श तयार करणे हा उद्देश होता, जेणेकरून स्थानिकांना, विशेषतः तरुणांना, दहशतवादात सामील होण्यासाठी भडकवता येईल.
"आम्ही ही शक्यता नाकारत नाही की काही नागरिक चकमकीत किंवा इतर घटनांमध्ये मरण पावले असतील, परंतु येथे नोंदवलेल्या बहुतेक कबरी एकतर अनोळखी विदेशी दहशतवाद्यांच्या आहेत किंवा स्थानिक दहशतवाद्यांच्या आहेत," असे अहवालात म्हटले आहे.
'सेव्ह यूथ सेव्ह काश्मीर फाउंडेशन'ने सांगितले आहे की, ते काश्मीरच्या इतर जिल्ह्यांमध्येही असाच अभ्यास करण्याची योजना आखत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page