कुलगाम चकमक नवव्या दिवशीही सुरूच, दोन जवान शहीद तर एका दहशतवाद्याचा खात्मा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील घनदाट जंगलात दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक शनिवारी नवव्या दिवशीही सुरूच असून, यात आणखी दोन जवान शहीद झाले आहेत. अलीकडच्या काळातील ही सर्वात दीर्घकाळ चाललेल्या चकमकींपैकी एक मानली जात आहे, कारण दहशतवादी घनदाट जंगलात दबा धरून बसल्याचे दिसत आहे.

लष्कराच्या १५ कोअर मुख्यालय, चिनार कोअरने 'X' वर एक पोस्ट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. "राष्ट्रसेवेत कर्तव्य बजावताना L/Nk प्रीतपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला चिनार कोअर सलाम करते. त्यांचे धैर्य आणि समर्पण आम्हाला नेहमीच प्रेरणा देईल. भारतीय लष्कर शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रति तीव्र संवेदना व्यक्त करते आणि त्यांच्या पाठीशी उभे आहे. ऑपरेशन सुरू आहे," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अधिकृत सूत्रांनुसार, रात्रभर चाललेल्या या गोळीबारात आणखी दोन जवान जखमी झाले असून, आतापर्यंत जखमी झालेल्या जवानांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे.

लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शेकडो जवान या मोठ्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी ड्रोन आणि अटॅक हेलिकॉप्टरचाही वापर केला आहे. अखलच्या घनदाट जंगलात ड्रोनच्या साहाय्याने दहशतवाद्यांच्या संभाव्य अड्ड्यांवर स्फोटके टाकण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. लष्कराचे विशेष दल (पॅरा-ट्रूपर्स) अत्यंत सावधगिरीने पुढे जात असून, हेलिकॉप्टर परिसरात टेहळणी करत आहेत.
 
गेल्या शुक्रवारी अखल परिसरात मोठ्या संख्येने दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली होती. सुरुवातीच्या गोळीबारात एक स्थानिक दहशतवादी मारला गेला होता.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (DGP) नलिन प्रभात हे स्वतः या ऑपरेशनवर देखरेख करत आहेत. "होय, अवघड भूभाग आणि दाट जंगल असल्यामुळे वेळ लागत आहे. पण आम्ही त्यांना शोधून काढू," असे प्रभात यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनुसार, कारवाई सुरू झाली तेव्हा पाच दहशतवादी असल्याची माहिती होती आणि त्यापैकी किमान तीन परदेशी दहशतवादी असून ते जंगल युद्धात प्रशिक्षित असल्याचे म्हटले जात आहे.