खलिस्तानी दहशतवादी पन्नूनचा नवा कट, NIA ने दाखल केला गुन्हा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
 'सिख फॉर जस्टिस' (SFJ) संघटनेचा प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून
'सिख फॉर जस्टिस' (SFJ) संघटनेचा प्रमुख दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 'सिख फॉर जस्टिस' (SFJ) या बंदी घातलेल्या संघटनेचा प्रमुख आणि अमेरिकेत राहणारा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याच्या विरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यापासून रोखण्यासाठी शीख सैनिकांना भडकावल्याचा आणि त्यासाठी त्यांना ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचा गंभीर आरोप पन्नूनवर आहे.

एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, १० ऑगस्ट २०२५ रोजी SFJ च्या अमेरिकेतील अधिकृत 'X' हँडलवरून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओचा उल्लेख आहे. या व्हिडिओमध्ये गुरपतवंत सिंग पन्नून पंतप्रधान मोदींना राष्ट्रध्वज फडकवण्यापासून रोखण्याचे आवाहन करत होता. त्याने यावेळी खलिस्तानचा एक नकाशाही प्रसिद्ध केला, ज्यात पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश दाखवण्यात आला होता.

एनआयएने म्हटले आहे की, पन्नून भारताची सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या कारवायांमध्ये गुंतला आहे आणि शीख समाजामध्ये भारताविरोधात असंतोष पसरवत आहे.

एफआयआरनुसार, केंद्र सरकारकडे असलेल्या माहितीवरून असेही दिसून आले आहे की, गुरपतवंत सिंग पन्नून याने १० ऑगस्ट रोजी पाकिस्तानातील लाहोर प्रेस क्लबमध्ये एक 'पत्रकार परिषद' आयोजित केली होती. वॉशिंग्टनमधून व्हिडिओ लिंकद्वारे पत्रकारांना संबोधित करताना, त्याने पंजाबवरील भारताचे सार्वभौमत्व नाकारले आणि खलिस्तानच्या मागणीला प्रोत्साहन दिले. "या पत्रकार परिषदेत, त्याने SFJ चा नवीन 'दिल्ली बनेगा खलिस्तान' या सार्वमताचा नकाशाही प्रसिद्ध केला," असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

पन्नूनवर भारतीय न्याय संहितेचे कलम ६१(२) (गुन्हेगारी कट) आणि 'बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायदा, १९६७' चे कलम १० आणि १३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.