दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सोमवारी चौथ्या दिवशीही सुरू आहे. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. चिनार कॉर्प्सच्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीपासून दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात चकमक सुरू होती.
या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. भारतीय सैन्य, जम्मू आणि काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि विशेष ऑपरेशन गट (एसओजी) यांनी हे संयुक्त ऑपरेशन केलं. भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’वर पोस्ट लिहिली.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ऑपरेशन अखल, कुलगाम. रात्रभर अधूनमधून तीव्र चकमक सुरू होती. सतर्क सैनिकांनी नियंत्रित गोळीबार करत दहशतवाद्यांवर कडी लावली,” असे त्यात म्हटले आहे. “आतापर्यंत सुरक्षा दलांनी एक दहशतवादी ठार केला आहे. ऑपरेशन सुरू आहे,” असं पोस्टमध्ये पुढे नमूद आहे.
यापूर्वी ३० जुलैला भारतीय सैन्याच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशन केले. या ऑपरेशनमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार झाले. व्हाइट नाइट कॉर्प्सने सांगितलं, “ऑपरेशन शिवशक्ती. यशस्वी घुसखोरीविरोधी ऑपरेशनमध्ये सतर्क भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणारे दोन दहशतवादी ठार केले.” “जलद कारवाई आणि अचूक गोळीबाराने दहशतवाद्यांचे कुटिल डावपेच हाणून पाडले. तीन शस्त्रं जप्त करण्यात आली. स्वतःच्या गुप्तचर युनिट्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एकत्रित आणि समन्वयित माहितीमुळे हे ऑपरेशन यशस्वी झालं,” असं निवेदनात म्हटलं आहे.
२९ जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तयबाचा प्रमुख कमांडर सुलेमान याच्यासह तीन दहशतवादी ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी ठार केले. “ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी ठार झाले. हे ऑपरेशन भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलं. सुलेमान हा लष्कर-ए-तयबाचा ए-श्रेणी कमांडर होता. अफगाण हा लष्कर-ए-तयबाचा ए-श्रेणी दहशतवादी होता. जिब्रानही ए-श्रेणी दहशतवादी होता. बैसारण खोऱ्यात आपल्या नागरिकांचा जीव घेणारे हे तिन्ही दहशतवादी ठार झाले,” असं शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरील दुसऱ्या चर्चेदरम्यान लोकसभेत सांगितलं. या तीन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरच्या दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात तीव्र चकमकीत सुरक्षा दलांनी ठार केलं.