हिंदी प्रकाशनाचा प्रवास - एका सामाजिक क्रांतीची गाथा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मंजीत ठाकुर

भारताच्या आधुनिक हिंदी साहित्यिक चेतनेचा एक मोठा अध्याय म्हणजे हिंदी प्रकाशनाचा इतिहास. ही केवळ पुस्तके आणि वृत्तपत्रे छापण्याची कहाणी नाही, तर एका सामाजिक क्रांतीची गाथा आहे. हिंदीचे मुद्रण आणि प्रकाशन जसे जसे विकसित होत गेले, तसतसे त्याने जनमानसाला जागरूक केले, राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि साहित्याला लोकभाषेचा सन्मान मिळवून दिला.

आज जेव्हा पुस्तकांचे जग डिजिटल पानांपर्यंत मर्यादित होत आहे, तेव्हा हे आठवणे महत्त्वाचे आहे की, हिंदी प्रकाशनाने किती कठीण मार्गांवरून चालत आपला पाया घातला आणि कोणत्या संस्थांनी त्याला आकार दिला.

हिंदी प्रकाशनाची कहाणी १९ व्या शतकापासून सुरू होते. भारतात मुद्रणकलेचे आगमन जरी १६ व्या शतकात पोर्तुगीजांच्या माध्यमातून झाले असले तरी, हिंदीमध्ये पद्धतशीर प्रकाशनाची सुरुवात खूप नंतर झाली. सर्वात आधी 'भारतमित्र' (१८७३, कलकत्ता) आणि 'कविवचन सुधा' (१८६८, कलकत्ता) यांसारखी वृत्तपत्रे समोर आली. पण खऱ्या अर्थाने हिंदी पत्रकारिता आणि प्रकाशनाला गती मिळाली 'उदंत मार्तंड' (१८२६) पासून, जे पंडित जुगलकिशोर शुक्ल यांनी कोलकात्याहून प्रकाशित केले. हे पहिले हिंदी साप्ताहिक होते.

या सुरुवातीच्या प्रकाशनांनी साहित्य, संस्कृती आणि समाजाच्या चेतनेत एक नवी हलचल निर्माण केली. हिंदी आता केवळ काव्याची भाषा राहिली नाही, तर ती समाज सुधारणा आणि राष्ट्रीय चेतनेचा आवाज बनू लागली.

प्रकाशन संस्थांचा उदय: छपाईतून पकडली संस्कृतीची नस

हिंदी वाचकांची संख्या वेगाने वाढल्यानंतर, संघटित प्रकाशन संस्था पुढे आल्या. या संस्था केवळ पुस्तके छापण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्या साहित्यिक प्रवाहाचे मार्गदर्शन करू लागल्या.

१८७० च्या आसपासच्या वर्षांमध्ये बनारसचा 'भारतजीवन प्रेस' हा हिंदी प्रकाशन जगताचा अग्रदूत होता. या प्रेसमधून अनेक पत्र-पत्रिका आणि पुस्तके निघाली. 'भारतजीवन' वृत्तपत्राने सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चेतनेला आवाज दिला.

दुसरीकडे, 'नागरी प्रचारिणी सभा, वाराणसी'ने हिंदीच्या मानकीकरणात आणि नागरी लिपीच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याच मालिकेत १९०० मध्ये ‘सरस्वती’ पत्रिकेचे प्रकाशन झाले. संपादक आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांनी तिला हिंदीच्या साहित्यिक चेतनेचे केंद्र बनवले.

द्विवेदी युगाने हिंदी गद्य, समीक्षा आणि नव्या कवितेला दिशा दिली. हेच ते व्यासपीठ होते, जिथे प्रेमचंद, जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांसारख्या रचनाकारांच्या रचना वाचकांपर्यंत पोहोचल्या.

प्रयाग (अलाहाबाद) ने हिंदी साहित्य आणि प्रकाशनाचे केंद्र बनून इतिहास रचला. ‘इंडियन प्रेस’ आणि नंतर 'सरस्वती प्रेस'ने साहित्यिकांची संपूर्ण पिढी घडवली. प्रेमचंद यांच्या कादंबऱ्या आणि कथा याच काळात पद्धतशीरपणे वाचकांपर्यंत पोहोचल्या.

अलाहाबादच्या (आता प्रयाग) 'हिंदुस्तानी अकादमी'ने शोधपरक, प्राच्य विद्या आणि साहित्यिक ग्रंथांचे प्रकाशन केले. गंभीर आणि उच्च दर्जाच्या हिंदी साहित्याला व्यासपीठ देण्यात तिची महत्त्वाची भूमिका राहिली.

स्वातंत्र्यानंतर हिंदी साहित्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. 'राजकमल प्रकाशन'ने आधुनिक हिंदी साहित्याला ओळख दिली. अज्ञेय, मुक्तिबोध, धर्मवीर भारती, निर्मल वर्मा, मन्नू भंडारी - या सर्व लेखकांची पुस्तके राजकमलने प्रकाशित केली. या संस्थेने गुणवत्ता आणि गांभीर्य दोन्ही संतुलित केले.

१९५०-६० च्या दशकात 'राधाकृष्ण प्रकाशन' ही आणखी एक प्रकाशन संस्था उदयास आली. या प्रकाशनाने कथा, कादंबरी आणि समीक्षा साहित्याला लोकप्रिय व्यासपीठ दिले. हरिशंकर परसाई, शरद जोशी यांसारख्या व्यंग्यकारांच्या रचना राधाकृष्ण प्रकाशनाने लोकांपर्यंत पोहोचवल्या.

'लोकभारती' आणि 'ज्ञानपीठ प्रकाशन' यांसारख्या संस्था आजही उच्च साहित्यिक मानकांसाठी ओळखल्या जातात. विशेषतः ज्ञानपीठ प्रकाशनाने हिंदीसह भारतीय भाषांमधील अभिजात रचनांचे प्रकाशन करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.

प्रकाशनाचे सामाजिक कार्य

हिंदी प्रकाशन केवळ साहित्यापुरते मर्यादित राहिले नाही. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात प्रकाशित होणारी वृत्तपत्रे आणि पत्रिका (जसे ‘भारत मित्र’, ‘हिंदी प्रदीप’, ‘कर्मयोगी’) यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची चेतना जागवली. पुस्तके आणि पत्रिका त्या काळात ‘घोषणापत्र’ प्रमाणे काम करत होत्या.

स्वातंत्र्यानंतर प्रकाशनाने शिक्षणाच्या प्रसारात महत्त्वाचे योगदान दिले. पाठ्यपुस्तके, पत्रिका आणि जनसाहित्य - सर्वांनी मिळून हिंदीला एक जिवंत भाषायी जग बनवले.

आजची हिंदी

आज हिंदी प्रकाशनासमोर दुहेरी आव्हान आहे. एकीकडे डिजिटल माध्यमांनी कागदी पुस्तकांच्या दुनियेला आव्हान दिले आहे, तर दुसरीकडे वाचकांच्या आवडीनिवडीही वेगाने बदलत आहेत. पण इतिहास साक्षी आहे की, हिंदी प्रकाशनाने प्रत्येक संकटाला संधीत बदलले आहे. आजही ई-पुस्तके, ऑडिओ बुक्स आणि ऑनलाइन पत्रिका नवीन वाचक वर्गापर्यंत पोहोचत आहेत. राजकमल, वाणी आणि इतर प्रकाशन संस्था आता डिजिटल माध्यमालाही आपलेसे करत आहेत.

हिंदी प्रकाशनाचे भविष्य

भविष्यात हिंदी प्रकाशनाला टिकून राहण्यासाठी तीन स्तंभांवर लक्ष ठेवावे लागेल: पहिली, गुणवत्ता म्हणजेच साहित्यिक गांभीर्य आणि भाषेचा सन्मान; दुसरी, सुलभता म्हणजेच पुस्तके प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचावीत, मग ती छापील असोत वा डिजिटल; आणि तिसरी, समकालीन जाणीव म्हणजेच आजचा समाज, राजकारण आणि तरुणांच्या आवाजाला व्यासपीठ मिळावे.

आज जेव्हा तरुण पिढी सोशल मीडियावर लिहित आहे आणि डिजिटल पुस्तके वाचत (आणि ऑडिओच्या रूपात ऐकत) आहे, तेव्हा हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, हिंदी प्रकाशनाचा पाया त्या संस्थांनी घातला होता, ज्यांनी कठीण परिस्थितीतही हिंदीला लोकभाषा म्हणून प्रतिष्ठित केले.

आजच्या काळातील हिंदी प्रकाशकांची भूमिका

हिंदी साहित्याने आपल्या प्रदीर्घ प्रवासात अनेक वळणे पाहिली आहेत. आज जेव्हा वाचक वर्ग वेगाने बदलत आहे आणि डिजिटल माध्यम पारंपरिक पुस्तकांना आव्हान देत आहे, तेव्हा हिंदी प्रकाशकांची भूमिका आणखी महत्त्वाची झाली आहे. ते केवळ साहित्य जिवंत ठेवत नाहीत, तर नवीन प्रयोग आणि व्यासपीठांच्या माध्यमातून ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.

  • राजकमल प्रकाशन समूह (दिल्ली): राजकमल हे हिंदी प्रकाशनातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित नाव आहे. ते अभिजात साहित्य, आधुनिक गद्य-कविता आणि समकालीन चिंतनाला सतत समोर आणत आहे. राजकमलने डिजिटल पुस्तके आणि ऑनलाइन बुकस्टोअरच्या माध्यमातून तरुणांनाही जोडले आहे.

  • वाणी प्रकाशन (दिल्ली): वाणीने हिंदी साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे कार्य केले आहे. अनुवाद, समकालीन कादंबरी आणि समीक्षा साहित्यात त्यांची भूमिका विशेष आहे. वाणी ‘वाणी प्रिझ्म’ सारख्या कार्यक्रमांतून नवीन लेखकांना व्यासपीठही देते.

  • राधाकृष्ण प्रकाशन (दिल्ली): हे प्रकाशन व्यंग्य आणि कथा साहित्याचे मोठे केंद्र राहिले आहे. हरिशंकर परसाई, शरद जोशींपासून ते समकालीन लेखकांपर्यंत - राधाकृष्णने हिंदी व्यंग्य आणि गद्य साहित्याला लोकप्रिय बनवले.

  • भारतीय ज्ञानपीठ (दिल्ली): ज्ञानपीठ प्रकाशनाने भारतीय भाषांमधील साहित्याला हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवण्यात खास योगदान दिले. अभिजात साहित्य आणि गंभीर पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांची प्रतिष्ठा कायम आहे.

  • लोकभारती प्रकाशन (अलाहाबाद/प्रयागराज): लोकभारतीने शोधपरक ग्रंथ आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांमधून हिंदी जगात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांची पुस्तके आजही विद्यार्थी आणि संशोधकांसाठी मूलभूत साहित्य मानली जातात.

  • अमर भारती प्रकाशन (दिल्ली): लोकप्रिय आणि समकालीन विषयांच्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध. त्यांनी हलक्या-फुलक्या साहित्यातून आणि लोकांच्या बाजूने लिहिलेल्या पुस्तकांतून मोठा वाचक वर्ग जोडला आहे.

  • पेंग्विन स्वदेश (दिल्ली): समकालीन कथा साहित्य आणि नव्या पिढीच्या लेखकांना प्रकाशित करण्यासाठी ओळखले जाते. सामाजिक आणि राजकीय विचारांच्या पुस्तकांना व्यासपीठ देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मूळ इंग्रजी प्रकाशन असलेल्या पेंग्विनने 'हिंद पॉकेट बुक्स'चे अधिग्रहण करून 'पेंग्विन स्वदेश' नावाने हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्येही पुस्तके प्रकाशित करण्याचे मोठे काम उचलले आहे.

  • प्रभात प्रकाशन (दिल्ली): प्रभात प्रकाशन जनसाहित्य, प्रेरक व्यक्तिमत्त्वांची चरित्रे आणि समकालीन विषयांवरील पुस्तकांसाठी लोकप्रिय आहे. हे प्रकाशन तरुण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांपर्यंत सहज पोहोचते.

  • नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी, भारत सरकार): एनबीटीने हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये कमी किमतीत दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ही साहित्य गावागावांत आणि शाळा-कॉलेजांपर्यंत नेणारी सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.

  • साहित्य अकादमी प्रकाशन: भारताची राष्ट्रीय साहित्यिक संस्था, जी भारतीय भाषांमधील श्रेष्ठ कृतींचा अनुवाद आणि प्रकाशन करते. हिंदीसह इतर भाषांमधील श्रेष्ठ साहित्य येथून मोठ्या वाचक वर्गापर्यंत पोहोचते.

भोपाळस्थित मंजुल प्रकाशन हे हिंदी प्रकाशन जगात तुलनेने नवीन पण प्रभावी नाव आहे. १९९९ मध्ये स्थापित झालेल्या या संस्थेने विशेषतः अनुवादित साहित्याच्या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर पुस्तके जसे की पाउलो कोएल्हो यांचे ‘द अल्केमिस्ट’, जे.के. रोलिंग यांची हॅरी पॉटर मालिका, रॉबिन शर्मा यांचे ‘द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी’ इत्यादींना हिंदीत आणून, त्यांनी हिंदी वाचकांना जागतिक साहित्याशी जोडले. 

तसेच, ते प्रेरणादायी, व्यवस्थापन, अध्यात्म आणि लोकप्रिय कादंबऱ्यांच्या प्रकाशनासाठीही ओळखले जाते. मंजुल प्रकाशनाची सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की, त्यांनी हिंदी वाचकांमध्ये वाचनाची नवीन संस्कृती विकसित केली आणि तरुणांना पुस्तकांच्या दुनियेशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आजचे हिंदी प्रकाशक केवळ पुस्तके छापणारे व्यावसायिक नाहीत, तर ते देशाचे सांस्कृतिक सेतू आहेत. ते नवीन आणि जुन्या साहित्याला जोडतात, अनुवादाच्या माध्यमातून भाषांचे पूल बांधतात आणि आता डिजिटल माध्यमातून वाचकांच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत.

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter