राजस्थान : मुस्लिम ‘मुलाने’ दिला हिंदू 'आई'ला मुखाग्नी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

"आईने भरवलेल्या एका भाकरीचे ऋण तरी कोण फेडू शकेल?" हे हृदय पिळवटून टाकणारे शब्द आहेत राजस्थानच्या भिलवाडा येथील ३० वर्षीय असगर अली खानचे. असगरने आपल्या 'मानलेल्या' हिंदू आई, शांती देवी यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि मुलाचे कर्तव्य म्हणून त्यांना मुखाग्नीही दिला. जात-धर्माच्या भिंती तोडणारी ही घटना, मानवतेचा आणि सांप्रदायिक सलोख्याचा एक मोठा संदेश देत आहे.

गांधी नगर भागातील जंगी चौकात राहणाऱ्या ६७ वर्षीय शांती देवी यांचे रविवारी निधन झाले. त्या काही काळापासून आजारी होत्या. पती आणि आपली तीन मुले गमावल्यानंतर, त्या गेल्या अनेक वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी, असगर अली खान पुढे आला.
 

काय आहे असगर आणि शांती देवींची कहाणी?
असगर सांगतो की, शांती देवी आणि त्याचे कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. "माझे आई-वडील आणि शांती देवी व त्यांचे पती, दोघेही जत्रांमध्ये छोटी दुकाने लावत. तेव्हापासून आमच्या कुटुंबांची ओळख होती. मी लहानपणापासूनच त्यांना 'मावशी-आई' म्हणत असे," तो सांगतो.

२०१० मध्ये पतीच्या निधनानंतर, शांती देवी आपल्या मुलासोबत असगरच्याच गल्लीत सलीम कुरेशी यांच्या घरात भाड्याने राहायला आल्या. काही वर्षांनी, त्यांच्या तरुण मुलाचाही एका प्राण्याच्या चावण्याने झालेल्या संसर्गामुळे मृत्यू झाला आणि त्या पूर्णपणे एकट्या पडल्या.

इकडे असगरच्या आई-वडिलांचेही निधन झाले होते. तो म्हणतो, "माझ्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले होते. पण शांती मावशीने मला कधीच आईची उणीव भासू दिली नाही. त्या माझ्या आईपेक्षाही जास्त प्रेम करत. मी कामावरून परतल्यावर, 'माझा मुलगा आला,' असे म्हणत त्या मायेने जवळ घेत. माझ्या खाण्यापिण्याची काळजी माझ्या पत्नीपेक्षाही जास्त त्या घेत."
 

असगर सांगतो की, "त्यांच्या आवडीचे पापड, शेव आणि गवारच्या भाजीसारखे पदार्थ त्या प्रेमाने बनवून मला खायला घालत. थंडीत माझ्या आंघोळीसाठी पाणी गरम करत, माझे कपडे धुत असत." त्यांच्या या प्रेमापोटी, असगरने आपल्या घरात मांसाहार बनवणे आणि खाणेही सोडून दिले होते. "आम्ही ईद आणि दिवाळी दोन्ही सण एकत्र आनंदाने साजरे करायचो," तो सांगतो.

अखेरचा प्रवास आणि मुलाचे कर्तव्य
शांती देवी आजारी असताना, असगरनेच त्यांची काळजी घेतली. त्यांच्या निधनानंतर, "माझी आई मला सोडून गेली," असे म्हणत तो ढसाढसा रडला. अस्गरने आपले मित्र अश्फाक कुरेशी, आबिद कुरेशी, शाकिर पठाण आणि इतरांच्या मदतीने त्यांच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली.

त्यांच्या अंत्ययात्रेत, परिसरातील मुस्लिम महिलांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. मध्य प्रदेशातून आलेले शांती देवींचे काही नातेवाईकही या यात्रेत सामील झाले. असगरनेच हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

"मी स्मशानातून त्यांच्या अस्थी गोळा केल्या आहेत. त्यांच्या इच्छेनुसार, मी त्या त्रिवेणी संगमात किंवा मातृकुंडिया येथे विसर्जित करेन. आणि तिथेही मी हीच प्रार्थना करेन की, भविष्यात कुठेही भेटलीस, तर माझी आई म्हणूनच भेट," असे असगर गहिवरल्या स्वरात म्हणाला. "प्रथा वेगळ्या असल्या तर काय झाले? ती आई होती. एवढेच पुरेसे आहे. जर मी तिला माझी आई मानले, तर सर्व विधी पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter