पूर्व विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यात पाऊस ओसरला आहे. उद्या (ता. १२) विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता आहे.
दक्षिण झारखंड व परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या विकानेरपासून, देवमाली, हमीरपूर दाल्तोंगज, जमशेपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश ते झारखंडपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
कमी दावाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात पाऊस ओसरला आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.३ अंश तापमानाची नोंदले गेले.
शनिवारी पावसाची शक्यता
उद्या (ता. १२) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जून महिना कोरडा गेल्यानंतर वरुणराजाने जुलैमध्ये मेहरबानी केल्याने पावसाचा बॅकलॉग भरून निघाला आहे. दोन-तीन दिवस बरसलेल्या दमदार पावसामुळे विदर्भातील अकराही जिल्ह्यांनी सरासरी गाठली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात सरासरीच्या ५१ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.
विदर्भात यंदा मॉन्सूनचे अपेक्षेपेक्षा लवकर आगमन झाल्यानंतर बळीराजासह सर्वसामान्यांनाही जूनमध्ये दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र वरुणराजाने घोर निराशा केली. त्यामुळे अकरापैकी जवळपास अर्धे जिल्हे रेड झोन अर्थात नाजूक स्थितीत होते. पुरेशा पावसाअभावी अनेक जिल्ह्यांमधील पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र जुलै महिन्यात मॉन्सून जोरात बरसल्याने पावसाची एकूणच उणीव भरून काढली. चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जून ते ११ जुलैपर्यंत विदर्भात सगळीकडेच बंपर पाऊस बरसला.
नागपूर शहराचा विचार केल्यास येथे आतापर्यंत ४०५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली, जो सरासरीच्या ५१ टक्के अधिक पाऊस आहे. तर सर्वाधिक ५३ टक्के पाऊस भंडारा जिल्ह्यात बरसला आहे. विदर्भात सर्वाधिक ५२० मिमी पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली आहे. विशेष म्हणजे, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. त्यामुळे साहजिकच शेतकरीही खुश आहे. भारतीय हवामान विभागाने जुलैच्या उत्तरार्धात आणि ऑगस्ट महिन्यातही धो-धो पावसाची शक्यता वर्तविली आहे.
धरणांच्या पातळीतही वाढ
गेले तीन दिवस बरसलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणांचीही पातळी वाढली आहे. उपराजधानीला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात सद्यःस्थितीत ६० टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला ५५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर कामठी खैरी जलाशयात ८७ टक्के, खिंडसी जलाशयात ५२ टक्के, वडगाव जलाशयात ५१ टक्के आणि नांद जलाशयात ३१ टक्के पाणी जमा झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे.