उत्तराखंड ढगफुटी : महाराष्ट्राचे ३१ पर्यटक अद्याप बेपत्ता; १२ जण मुंबईचे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील १५१ पर्यटकांपैकी १२० जण सुरक्षित असून, ते इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) कॅम्पमध्ये आहेत. मात्र, अद्यापही ३१ पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही, ज्यात मुंबई उपनगरातील १२ जणांचा समावेश आहे. खराब हवामान आणि दळणवळणाच्या साधनांअभावी बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या पर्यटकांमध्ये मुंबई, ठाणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, टिटवाळा आणि अहिल्यानगर येथील नागरिकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आणि हवामान सुधारताच पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमान किंवा रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांच्याशी संपर्क साधून उर्वरित ३१ पर्यटकांना शोधण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली आहे. ढगाळ हवामान, खराब मोबाईल नेटवर्क आणि फोन चार्जिंगच्या सुविधांचा अभाव यामुळे उर्वरित पर्यटकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे उत्तराखंड प्रशासनाने कळवले आहे. मात्र, आता या भागात सॅटेलाइट फोन सक्रिय करण्यात आले असून, दूरसंचार विभागाच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांच्या शेवटच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेतला जात आहे.

मुंबईतील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष उत्तराखंडमधील नियंत्रण कक्ष, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र आणि उत्तरकाशीच्या जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. पर्यटकांच्या कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.