शेतकरीहिताशी तडजोड नाही - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

"भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. त्यासाठी काहीही वैयक्तिक किंमत चुकवावी लागली तरी चालेल, माझी तयारी आहे, "अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. अमेरिकेने वाढीव शुल्क लादण्याची केलेली घोषणा, रशियाकडून तेलखरेदीला डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध आणि अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार कराराच्या वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही भूमिका मांडली.

कृषिशास्वज्ञ एम. एस. स्वामीनाथन जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित होते. ते म्हणाले, "भारतीय शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. यासाठी व्यक्तिगत पातळीवर खूप मोठी किंमत मोजावी लागेल, हे मला ठाऊक आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांसाठी, देशातील मच्छीमारांसाठी आणि देशातील पशुपालकांसाठी ते सोसण्यास मी तयार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, लागवडीचा खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे या उद्दिष्टांवर आम्ही सतत काम करत आहोत. शेतकऱ्यांची ताकद हाच देशाच्या प्रगतीचा पाया आहे, हे सरकारला माहीत आहे."

विज्ञानाचा उपयोग लोकसेवेसाठी
प्रा. स्वामीनाथन यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधालाही उजाळा दिला. ते म्हणाले, "प्रा. स्वामीनाथन यांच्याशी आपले जुने संबंध होते. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्यात 'मृदा आरोग्य पत्रिका' योजनेवर काम सुरू केले होते. त्यावेळी स्वामीनाथन यांनी या योजनेत विशेष रस दाखवला. त्यांनी मोकळेपणाने सूचना दिल्या आणि मार्गदर्शनही केले. त्यांच्या योगदानामुळे या उपक्रमाला मोठे यश मिळाले होते.

काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे योगदान विशिष्ट काळापुरते किंवा विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाही. स्वामीनाथन हे अशाच महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी विज्ञानाचा उपयोग लोकसेवेसाठी केला. त्यांनी देशाची अन्नसुरक्षा हे आपल्या आयुष्याचे ध्येय मानले आणि अशी जागरूकता निर्माण केली जी पुढील अनेक शतकांपर्यंत भारताच्या धोरणांना आणि प्राधान्यक्रमांना दिशा मिळत राहील. ते भारत मातेचे खरे सुपुत्र होते."

अमेरिकेला अप्रत्यक्ष इशारा
भारताशी व्यापार करारासाठी अमेरिकेने आपल्या सर्व कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे हटविण्याची मागणी केली आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के शुल्क आणि रशियाकडून तेल खरेदीबद्दल अतिरिक्त २५ टक्के दंड आकारल्याने या निर्यातीवरील एकूण शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मत्स्योत्पादनाच्या निर्यातीवरही परिणाम होण्याची भीती आहे.

अमेरिकेचे हे धोरण अनुचित आणि अन्याय करणारे असल्याचे सडेतोड प्रत्युत्तर परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. रशियाकडून तेल आयातीबद्दलही आपली भूमिका स्पष्ट करताना, भारताकडून होणारी आयात १.४० अब्ज भारतीयांची ऊर्जेची गरज सुरक्षित राखण्यासाठी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे शेतकरीहिताच्या रक्षणाबद्दलचे वक्तव्य शुल्क दंडेलीला विरोध दर्शविणारे असल्याचे मानले जात आहे.