पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. "युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध तातडीने थांबून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारत शक्य ते सर्व प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे, झेलेन्स्की यांच्याशी बोलताना सांगितले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या समाज माध्यमातून दिली. युक्रेन युद्धाबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये लवकरच चर्चा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत झेलेन्स्की यांनी भारताचे कौतुक केले आहे. झेलेन्स्की यांनीदेखील समाज माध्यमातून या चर्चेबाबत माहिती दिली आहे. "पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर मर्यादा आणणे गरजेचे असल्याचा मुद्दाही चर्चेत उपस्थित केला," असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर जाणार ?
सप्टेंबर महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि मी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचे ठरवले आहे, असे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.