एकाच वेळी 'नीट' परीक्षा पास: आई-मुलीच्या अनोख्या यशाची कथा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 30 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तामिळनाडूमध्ये एका ४९ वर्षीय फिजिओथेरपिस्ट आणि तिच्या मुलीने एकाच वेळी 'नीट' (NEET) परीक्षा उत्तीर्ण करत दुर्मीळ योगायोग आणि असामान्य जिद्द दाखवली आहे. आईला तिच्या जिल्ह्याजवळील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला असून, मुलीचा वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास सुरू होणार आहे.

अमृता वल्ली मणिवण्णन यांना 'नीट'चा अभ्यासक्रम त्यांच्या शालेय दिवसांपेक्षा खूप कठीण आणि वेगळा वाटला. तरीही, आपल्या मुलीची तयारी पाहून त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली.

'मुलीमुळेच माझे स्वप्न पुन्हा जागृत झाले'
"माझ्या मुलीला 'नीट'ची तयारी करताना पाहून माझी महत्त्वाकांक्षा पुन्हा जागृत झाली. तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. मी तिची पुस्तके घेऊन अभ्यास केला," असे आनंदी अमृता वल्ली यांनी सांगितले.

सीबीएससीची विद्यार्थिनी असलेल्या एम. संयुक्ताने कोचिंग क्लास लावला होता आणि तिच्या पुस्तकांनी तिच्या आईलाही मदत केली. "जेव्हा मी अभ्यासलेले कोणालातरी सांगते, तेव्हा ते लक्षात ठेवणे मला सोपे वाटते. माझे वडील वकील असल्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रात रस नव्हता. पण माझी आई वैद्यकीय पार्श्वभूमीची असल्यामुळे त्यांना मी सांगितलेले सहज समजायचे," असे संयुक्ताने सांगितले.

३० जुलै रोजी तामिळनाडू वैद्यकीय प्रवेशासाठी समुपदेशन सुरू झाले, तेव्हा अमृता वल्ली आपल्या मुलीसोबत 'बेंचमार्क अपंग' (PwD) श्रेणीतून समुपदेशनासाठी उपस्थित होत्या. त्यांना त्यांच्या मूळ तेनकासी जिल्ह्याजवळील विरुधुनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यांनी 'नीट'मध्ये १४७ गुण मिळवले.

आई-मुलीची वेगळी वाट
अमृता वल्ली म्हणाल्या की, सुमारे तीन दशकांपूर्वी शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमबीबीएसला प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता, पण शक्य झाले नाही. त्याऐवजी त्यांना फिजिओथेरपीचा अभ्यास करावा लागला.

पत्रकारांशी बोलताना संयुक्ता म्हणाली, "मला माझ्या आईसोबत एकाच कॉलेजमध्ये शिकायचे नाही. मला सामान्य कोट्यातून स्पर्धा करून इतरत्र, कदाचित राज्याबाहेर अभ्यास करायचा आहे." तिने 'नीट'मध्ये ४५० गुण मिळवले. ती अनुसूचित जाती (SC) कोट्यातूनही स्पर्धा करू शकते, असे तिच्या आईने पत्रकारांना सांगितले.

"माझ्या पतीने आम्हाला खूप पाठिंबा दिला. त्यांनी आम्हाला 'नीट'चा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले," असे अमृता वल्ली यांनी जोडले. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयांतर्गत निवड समितीने ३० जुलै रोजी ७.५ टक्के सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, विशेष श्रेणी, बेंचमार्क अपंग, माजी सैनिकांची मुले आणि प्रसिद्ध खेळाडू यांच्यासाठी ऑफलाइन समुपदेशन (कौन्सिलिंग) घेतले.