भारतीय लष्करात शौर्य गाजवणारे प्रसिद्ध मुस्लिम सेनानी

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 3 Months ago
लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, अब्दुल हमीद, ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान, कॅप्टन अब्बास अली, जनरल शाह नवाज खान, मेजर जनरल मोहम्मद जमान कियानी व कर्नल निजामुद्दीन.
लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, अब्दुल हमीद, ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान, कॅप्टन अब्बास अली, जनरल शाह नवाज खान, मेजर जनरल मोहम्मद जमान कियानी व कर्नल निजामुद्दीन.

 

लडाखच्या बर्फाच्छादित दऱ्या असोत किंवा सियाचीन व जैसलमेरची उष्ण वाळू... समुद्राच्या लाटा असोत किंवा आकाशातून येणारी वादळे असोत... या सगळ्याला सामोरा जाऊन जो आपले रक्षण करतो तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयाच्या जवळ असतो. या शूर सुपुत्रांमध्ये असे काही लष्करी जवान आहेत ज्यांच्याविषयी देशाला नेहमीच अभिमान वाटतो. लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, अब्दुल हमीद, ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान, कॅप्टन अब्बास अली, जनरल शाह नवाज खान, मेजर जनरल मोहम्मद जमान कियानी व कर्नल निजामुद्दीन हे भारतमातेचे असेच शूर जवान होते. त्यांचे बलिदान, त्याग आणि देशभक्ती कधीही विसरता येणार नाही. ज्यांच्या शौर्याच्या कहाण्या आपण आपल्या भावी पिढ्यांना सांगायला हव्यात, असे भारतीय इतिहासात अनेक शूर पुत्र होते. कारण, या कथा केवळ काही जवानांच्या शौर्याच्या कथा नाहीत, तर त्यांच्या निष्ठा आणि त्यागाच्याही कथा आहेत. जाणून घेऊया अशाच काही शौर्यगाथा...

१. ब्रिगेडिअर मोहम्मद उस्मान
उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील बिबीपूर गावात १५ जुलै १९१२ रोजी मोहम्मद उस्मान यांचा जन्म झाला. ब्रिगेडिअर उस्मान जर हुतात्मा झाले नसते तर ते देशाचे पहिले मुस्लिम लष्करप्रमुख झाले असते असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. उस्मान हे अतिशय कर्तबगार अधिकारी होते. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान त्यांना मोहम्मद अली जीना यांच्याकडून पाकिस्तानी सैन्यात भरती होण्याची ऑफर आली होती. "आपण मुस्लिम आहोत, तेव्हा भरतीसाठी पाकिस्तानचीच निवड करा," असा दबाव त्यांच्यावर आणला जात होता. मात्र, 'आपण जरी धर्माने मुस्लिम असलो तरी आपला देश हिंदुस्थान हाच आहे,' असेच उस्मान शेवटपर्यंत सांगत राहिले.

फेब्रुवारी १९४८ मध्ये पाकिस्तानने नौशेरा या ठिकाणी (जिल्हा : राजौरी, जम्मू) मोठा हल्ला केला. उस्मान यांच्या नेतृत्वामुळे भारताने त्याच दिवशी तो हल्ला परतवून लावत विजय मिळवला. या शौर्यामुळे उस्मान यांची ओळख 'नौशेराचा सिंह' अशी झाली. या यशामुळे ते देशभर प्रसिद्ध झाले. पाकिस्तानला या पराभवाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्यांनी उस्मान यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्या काळी ही रक्कम फार मोठी होती. या हल्ल्यादरम्यान उस्मान यांना सांगण्यात आले होते की, 'पाकिस्तानचे काही सैनिक एका धार्मिक इमारतीच्या मागे लपले आहेत.' तेथे गोळीबार करताना भारतीय जवान कचरत होते. उस्मान त्या जवानांना म्हणाले होते की, "जर एखाद्या धार्मिक इमारतीचा वापर शत्रूला आश्रय देण्यासाठी होत असेल तर ती पवित्र नाही." त्यांनी ती इमारत पाडण्याचे लष्कराला आदेश दिले." ०३ जुलै १९४८ रोजी भारत-पाकिस्तान युद्धात उस्मान हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर जामिया मिलिया विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे मंत्रिमंडळातील सदस्यांसह तेथे उपस्थित होते. उस्मान यांना मरणोत्तर महावीरचक्र प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा त्यानंतर लगेचच करण्यात आली.

२. मेजर जनरल मोहम्मद जमान कियानी
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात १९१० मध्ये मोहम्मद जमान कियानी यांचा जन्म झाला. १९३१ मध्ये डेहराडून येथील 'इंडियन मिलिटरी अकादमी'च्या पहिल्या बॅचमध्ये ते कॅडेट म्हणून प्रविष्ट झाले. पुढे कियानी यांना त्यांच्या कामगिरीबद्दल 'स्वोर्ड ऑफ ऑनर' हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. पुढे ते ब्रिटिश-भारतीय लष्करात दाखल झाले. कियानी यांनी पहिल्या बटालियनच्या 'चौदाव्या पंजाब रेजिमेंट'मध्ये जबाबदारी स्वीकारली. सन १९४१ मध्ये मलाया (आताचे द्वीपकल्पीय मलेशिया) येथे त्यांची कारकीर्द प्रभारी अधिकारी म्हणून  सुरू झाली. सप्टेंबर १९४२ मध्ये जेव्हा दुसऱ्या महायुद्धात जपानकडून ब्रिटिश सैन्याचा पराभव झाला तेव्हा ते कॅप्टन मोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय लष्करात (इंडियन नॅशनल आर्मी - आयएनए) दाखल झाले. पुढे कियानी यांनी 'चीफ ऑफ जनरल स्टाफ' म्हणून पदभार स्वीकारला आणि भारतीय राष्ट्रीय लष्कर त्यांनी अधिक बळकट केले. 

पुढे भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या पहिल्या तुकडीचे कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली 'चलो दिल्ली' ही हाक प्रत्यक्षात आणण्यासाठी ते १९४४ मध्ये ब्रह्मदेशातील (आताचे म्यानमार) युद्धाच्या मैदानात उतरले. सुरुवातीच्या विजयांमध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय लष्कराच्या तुकड्यांचे नेतृत्व केले. जपानी नेत्यांशी झालेल्या चर्चेत भाग घेण्यासाठी ते नेताजींसोबत सप्टेंबर १९४४ मध्ये युद्धपरिषदेचे सरचिटणीस म्हणून टोकिओला गेले. त्या काळात त्यांना मेजर जनरल म्हणून बढती मिळाली. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय लष्कराने माघार घेतली. ऑगस्ट १९४५ मध्ये, नेताजींच्या जागी नेताजींच्याच निर्देशानुसार, भारतीय राष्ट्रीय लस्कराची सूत्रे जमान यांनी हाती घेतली. दरम्यान, ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. सुटकेनंतर डिसेंबर १९४५ मध्ये कियानी दिल्लीला गेले आणि तिथून भारतीय राष्ट्रीय लष्करातील जवानांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केले. नेताजींच्या 'आझाद हिंद सेने'त त्यांचे मोठेच योगदान होते. चार जून १९८१ रोजी त्यांचे निधन झाले. 

३. कॅप्टन अब्बास अली 
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात तीन जानेवारी १९२० रोजी स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन अब्बास अली यांचा जन्म झाला. भगतसिंग यांच्या क्रांतिकारी विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी भगतसिंग यांच्या 'नौजवान भारत सभा' या पक्षात प्रवेश केला. अब्बास यांनी 'अलिगढ मुस्लिम विद्यापीठा'तून पुढील शिक्षण पूर्ण केले. सन १९३९ मध्ये ते ब्रिटिश-भारतीय लष्करात दाखल झाले. त्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचा बिगुल फुंकला होता. अशा परिस्थितीत त्यांनी ब्रिटिश सैन्याची नोकरी सोडली. सन १९४३ मध्ये नेताजींच्या भाषणाने कॅप्टन अब्बास प्रेरित झाले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. नेताजींचे सहकारी बनून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्राणपणाने लढा दिला. पुढे समाजवादी विचारसरणीशीही ते जोडले गेले. दरम्यान, अब्बास यांना ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेतले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, याचदरम्यान भारत स्वतंत्र झाला आणि अब्बास यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. ११ ऑक्टोबर २०१४ रोजी अब्बास यांनी अलिगढच्या 'जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज'मध्ये अखेरचा श्वास घेतला.

४. अब्दुल हमीद
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील धामुपूर गावात एक जुलै १९३३ रोजी एका सामान्य कुटुंबात अब्दुल हमीद यांचा जन्म झाला. हवलदार अब्दुल हमीद मसूदी हे २७ डिसेंबर १९५४ रोजी भारतीय लष्कराच्या 'ग्रेनेडिअर रेजिमेंट'मध्ये दाखल झाले. ते भारतीय लष्कराच्या चौथ्या 'ग्रेनेडिअर डिव्हिजन'मधील एक जवान होते. आपल्या बटालियनसह त्यांनी आग्रा, अमृतसर, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, नेफा आणि रामगढ येथे भारतीय लष्कराची सेवा बजावली. चीन-भारत युद्धात ब्रिगेडिअर जॉन दळवी यांच्या नेतृत्वाखाली 'पीपल्स लिबरेशन आर्मी'शी त्यांनी लढा दिला. त्यांच्या सेवाकाळात त्यांना सैनिकी सेवा पदक, समर सर्व्हिस मेडल आणि डिफेन्स मेडल असे सन्मान मिळाले होते. त्यांनी १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान खेमकरण सेक्टरमधील असल उत्ताड येथे झालेल्या लढाईत असामान्य शौर्य दाखवून हौतात्म्य पत्करले. या शौर्यासाठी त्यांना भारताच्या सर्वोच्च लष्करी पुरस्काराने, म्हणजेच परमवीर चक्राने, मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. १६ सप्टेंबर १९६५ रोजी त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला. 

५. जनरल शाहनवाज खान 
आताच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडीच्या मतौर गावात २४ जानेवारी १९१४ रोजी जनरल शाह नवाज खान यांचा जन्म झाला. डेहराडूनच्या 'प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेज'मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सन १९४० मध्ये शाह नवाज ब्रिटिश भारतीय लष्करात दाखल झाले. पुढे १९४३ मध्ये खान हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या प्रभावाने ते 'आझाद हिंद सेने'त दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश साम्राज्याचा ध्वज उतरवून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे पहिले भारतीय बनून त्यांनी इतिहास घडवला. या घटनेनंतर त्यांचे नाव लोकप्रिय झाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मेरठमधून लोकसभेची निवडणूक जिंकली. वीस वर्षांहून अधिक काळ ते केंद्रात मंत्री होते. 

६. कर्नल निजामुद्दीन
उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील ढकवान गावात सन १९०१ मध्ये कर्नल निजामुद्दीन यांचा जन्म झाला. वयाच्या विसाव्या वर्षी निजामुद्दीन ब्रिटीश सैन्यात दाखल झाले. ते लष्करात सेवा करत असताना तिथे एक प्रसंग घडला. 'भारतीय शिपायांना मरू द्या; पण उर्वरित सैन्यासाठी अन्न वाहून नेणाऱ्या गाढवांना आधी वाचवा,' अशी भूमिका ब्रिटिश सैन्याच्या एक जनरलने तेव्हा घेतली होती. निजामुद्दीन यांच्या कानावर त्या जनरलचे हे म्हणणे पडले. ह्या भूमिकेमुळे त्या जनरलचा राग येऊन रागाच्या भरात निजामुद्दीन यांनी त्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. पुढे निजामुद्दीन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 'आझाद हिंद सेने'त  गेले. नेताजींनी निजामुद्दीन यांना प्रेमाने 'कर्नल' हे टोपणनाव दिले होते. निजामुद्दीन १९४३ ते १९४४ दरम्यान ब्रिटिश सैन्याविरुद्ध नेताजींसोबत ब्रह्मदेशात (आताचा म्यानमार) लढले. सन १९४३ मध्ये एका प्रसंगी गोळीबार होत असताना नेताजींचा जीव वाचवण्यासाठी निजामुद्दीन यांनी नेताजींसमोर उडी मारली. आणि, त्यातच गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला. 

७. लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात ऑगस्ट १९४८ मध्ये लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह यांचा जन्म झाला. नैनितालच्या 'सेंट जोसेफ स्कूल'मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी पुण्याजवळच्या खडकवासला येथील 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'त (एनडीए) शिक्षण घेतले. नऊ जून १९६८ रोजी त्यांची नियुक्ती '१८५ लाइट इन्फंट्री रेजिमेंट'मध्ये करण्यात आली. जनरल शाह हे भारतीय लष्कराच्या 'द ग्रेनेडिअर्स रेजिमेंट'चे कर्नल कमांडंट होते. सन २००२ मध्ये झालेल्या गुजरातमधील दंगलीत त्यांनी लष्कराचे नेतृत्व केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी काही काळ 'सशस्त्र सेना न्यायाधिकरणा'च्या खंडपीठावर प्रशासकीय सदस्य म्हणूनही काम केले. पुढे २०१२ ते २०१७ पर्यंत त्यांनी 'अलिगढ मुस्लिम विद्यापीठा'चे कुलगुरू म्हणून काम पाहिले. 

- छाया काविरे ([email protected])
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter