भारताचे ज्ञानसूर्य : देश घडवणारे १० मुस्लिम शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताच्या विविधरंगी सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेत मुस्लिम समाजातील अनेक अशी व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि बौद्धिक नेतृत्वाच्या माध्यमातून राष्ट्राच्या उन्नतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

या व्यक्तींचे प्रेरणादायी जीवनप्रवास केवळ मुस्लिम समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आदर्श बनले आहेत. खाली भारतातील काही अशाच शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि इतिहासकारांचा परिचय दिला आहे, ज्यांनी आपल्या दूरदृष्टी, निष्ठा आणि समर्पणाने शिक्षण आणि समाजाला नवी दिशा दिली.

खलीक अहमद निझामी
 

खलीक अहमद निझामी (५ डिसेंबर १९२५ – ४ डिसेंबर १९९७) हे एक भारतीय इतिहासकार, धार्मिक विद्वान आणि राजदूत होते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे झाला होता. त्यांनी आग्रा विद्यापीठातून १९४५ मध्ये इतिहासात एम.ए. आणि १९४६ मध्ये एल.एल.बी. पदवी मिळवली. १९४७ मध्ये त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारला. ते १९७४ मध्ये विद्यापीठाचे कुलगुरू (अध्यक्ष) देखील होते. 

१९७५ ते १९७७ या काळात त्यांनी सीरियामध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले. निझामी साहेबांनी मध्ययुगीन भारतीय इतिहास, विशेषतः दिल्ली सल्तनत आणि सुफीवादावर महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा खालीलप्रमाणे: On History and Historians of Medieval India, Royalty in Medieval India, The Life & Times of Shaikh Nizam-u'd-din Auliya, The Life and Times of Shaikh Farid-ud-din Ganj-i-Shakar, Some Aspects of Religion and Politics in India During the 13th Century, Medieval India: A Miscellany.

त्यांच्या संशोधन कार्यामध्ये शाह वलीउल्लाह यांच्या राजकीय पत्रव्यवहाराच्या प्रकाशनाचाही समावेश आहे. यामुळे भारतीय मुस्लिम इतिहासातील त्यांचे योगदान अधिक प्रभावीपणे समोर आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अलीगढ मुस्लिम विद्यापीठात 'के. ए. निझामी सेंटर फॉर कुरॅनिक स्टडीज'ची स्थापना करण्यात आली आहे, जे कुराण आणि इस्लामी अध्ययनाच्या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देते.

प्रा. सय्यद ऐनुल हसन

प्रा. सय्यद ऐनुल हसन हे एक बहुभाषातज्ज्ञ, साहित्यकार आणि कुशल प्रशासक आहेत. ते मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे (MANUU) कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत, जिथे त्यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल शिक्षण, शैक्षणिक नवनवीन शोध आणि सर्वसमावेशक शिक्षणाला नवी उंची मिळाली आहे. 
 
त्यांनी जेएनयूमध्ये पर्शियन आणि मध्य आशियाई अध्ययन विभागात प्राध्यापक म्हणून पर्शियन साहित्य, भारत-इराण सांस्कृतिक संबंध आणि ऐतिहासिक अभ्यासांवर उल्लेखनीय संशोधन केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी आणि अनुवाद कार्यांनी उर्दू, हिंदी आणि पर्शियन साहित्याला समृद्ध केले आहे. जानेवारी २०२५ मध्ये, भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले, जो त्यांच्या अनेक दशकांच्या शैक्षणिक साधनेचा आणि भाषिक समर्पणाचा राष्ट्रीय सन्मान आहे.

डॉ. जहीर आय. काझी

डॉ. जहीर आय. काझी हे मुंबईतील अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही शैक्षणिक संघटना देशभरात ९० पेक्षा जास्त संस्था चालवते. डॉ. काझी यांनी शिक्षणाला सामाजिक न्याय आणि समाजाच्या सक्षमीकरणाचे माध्यम बनवले. त्यांनी शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण वंचित समाजासाठी सहज उपलब्ध करून दिले. 

काझी यांच्या दूरदृष्टीमुळे अंजुमन-ए-इस्लामने मुलींच्या शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले आणि रोजगारभिमुख अभ्यासक्रमांची सुरुवात केली. एप्रिल २०२४ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले – हा सन्मान त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिक्षण-संबंधित क्रांतिकारी बदलांचा पुरावा आहे.

मौलाना डॉ. कल्बे सादिक

मौलाना डॉ. कल्बे सादिक हे एक असे इस्लामिक विद्वान होते ज्यांनी धर्माला समाजसुधारणा आणि शिक्षणाशी जोडले. तौहीदुल मुस्लिमीन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्था आणि मदत केंद्रांची स्थापना केली, जिथे गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना मदत दिली जात होती. 

सादिक यांनी मुस्लिम समाजातील मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आणि धार्मिक कट्टरतेविरुद्ध उदार, वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या विचारांमध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा समतोल होता. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना जानेवारी २०२१ मध्ये मरणोत्तर 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले.

सय्यद हामिद

सय्यद हामिद हे भारतीय मुस्लिम समाजातील एक प्रसिद्ध शिक्षण सुधारक, प्रशासक आणि समाजसेवी होते. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे (AMU) माजी उप-कुलगुरू, सनदी सेवक आणि सच्चर समितीचे सदस्य म्हणून ओळखले जातात. सय्यद हामिद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला होता. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी आणि पर्शियन भाषेत एम.ए. पदवी मिळवली. १९४३ मध्ये त्यांची उत्तर प्रदेश नागरी सेवेत निवड झाली आणि १९४९ मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) सामील झाले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. 

१९८० मध्ये ते AMU चे उप-कुलगुरू बनले आणि त्यांनी विद्यापीठात शिस्त आणि शैक्षणिक सुधारणा लागू केल्या. त्यांनी विभागप्रमुखांसाठी कार्यकाळ प्रणाली सुरू केली आणि विद्यापीठाचे प्रशासन मजबूत केले. १९९२ मध्ये त्यांनी ‘ऑल इंडिया तालीमी कारवां’ची सुरुवात केली, ज्याचा उद्देश भारतीय मुस्लिमांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता पसरवणे हा होता. १९९३ मध्ये त्यांनी दिल्लीत हमदर्द पब्लिक स्कूलची स्थापना केली आणि १९९९ मध्ये दिल्लीच्या हमदर्द युनिव्हर्सिटीचे कुलपती (Chancellor) बनले. त्यांनी या विद्यापीठाला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 

सय्यद हामिद यांना त्यांच्या शिक्षण आणि समाजसेवेसाठी अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात संस्कृतिवार्ड, उर्दू अकादमी पुरस्कार, हिंदी अकादमी पुरस्कार आणि सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय फेलोशिप यांचा समावेश आहे. त्यांच्या स्मरणार्थ AMU च्या वरिष्ठ माध्यमिक शाळेचे नाव ‘सय्यद हमीद सीनियर सेकंडरी स्कूल’ ठेवण्यात आले आणि हैदराबादच्या मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीच्या केंद्रीय ग्रंथालयाचे नाव ‘सय्यद हमीद सेंट्रल लायब्ररी’ ठेवण्यात आले.

प्रा. मुशीरुल हसन

पद्मश्री प्रोफेसर मुशीरुल हसन हे केवळ एक प्रसिद्ध इतिहासकार नव्हते, तर त्यांनी एक प्रभावी शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि समाजचिंतक म्हणूनही आपली अमिट छाप सोडली. कुलगुरू म्हणून त्यांनी जामिया मिलिया इस्लामियाला एका सामान्य संस्थेतून देशातील प्रमुख विद्यापीठांच्या श्रेणीत आणून ठेवले. त्यांच्या कार्यकाळात जामियाचा भव्य कायापलट झाला — सुंदर परिसर, सुसज्ज इमारती आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण हे त्यांच्या दूरदृष्टीचे फळ होते.
 
प्रा. हसन यांचा संबंध केवळ शैक्षणिक जगाशी नव्हता, तर ते सामाजिक आणि राजकीय चर्चेतही सक्रिय असत. एनडीटीव्ही (NDTV) आणि बीबीसी (BBC) सारख्या मंचांवर त्यांची निर्भीड उपस्थिती सामान्य होती. इंग्रजी आणि उर्दू दोन्ही भाषांमध्ये अस्खलित लेखन आणि वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी युरोपमधून उच्च शिक्षण घेतले आणि नंतर जामियामध्ये रुजू झाले. त्यांचे वडीलही जामियामध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांचा या संस्थेशी खोलवर संबंध होता. २०१४ मध्ये एका गंभीर रस्ते अपघातानंतर त्यांची प्रकृती खालावली, पण त्यांनी संघर्ष करत जीवन व्यतीत केले.

डॉ. नईमा खातून

अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU) १२३ वर्षांच्या गौरवशाली इतिहासात पहिल्यांदाच महिला कुलगुरू म्हणून प्रोफेसर नईमा खातून यांच्या निवडीने एक नवा आदर्श घालून दिला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे AMU देशातील त्या निवडक केंद्रीय विद्यापीठांमध्ये सामील झाले आहे जिथे महिलांनी हे सर्वोच्च पद भूषवले आहे. 

प्रा. नईमा खातून यांनी ऑगस्ट १९८८ मध्ये AMU च्या मानसशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. आपल्या कठोर मेहनतीने आणि समर्पणाने त्या सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख पदापर्यंत पोहोचल्या. जुलै २०१४ मध्ये त्यांची महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणूनही नियुक्ती झाली. त्यांचा प्रशासकीय अनुभवही व्यापक आहे, ज्यात त्यांनी रेसिडेन्शियल कोचिंग अकादमीच्या उप-संचालक, उप-प्रॉक्टर आणि प्रोव्होस्ट या पदांवर काम केले. त्यांनी रवांडाच्या राष्ट्रीय विद्यापीठातही एक वर्ष अध्यापन केले. 

प्रा. खातून यांनी राजकीय मानसशास्त्रात पीएचडी केली आहे आणि आपले संशोधन जगातील अनेक देशांतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये सादर केले आहे. त्या सहा पुस्तकांच्या आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांच्या लेखिका आहेत.

प्रा. नजमा अख्तर

नजमा अख्तर या एक प्रतिष्ठित भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि प्रशासक आहेत, ज्यांनी १२ एप्रिल २०१९ ते १२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत जामिया मिलिया इस्लामियाच्या (JMI) पहिल्या महिला कुलगुरू म्हणून काम केले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आणि विद्यापीठाच्या इतिहासात आपली महत्त्वपूर्ण छाप सोडली. नजमा अख्तर यांनी जामियामध्ये वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवले आणि राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा शिष्यवृत्तीने त्यांना सन्मानित करण्यात आले. 

त्यानंतर नजमा अख्तर यांनीकुरुक्षेत्र विद्यापीठातून शिक्षणात पीएचडी केली. त्यांनी यूकेच्या वॉरविक विद्यापीठात कॉमनवेल्थ फेलोशिप अंतर्गत विद्यापीठ प्रशासनाचा अभ्यास केला आणि पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थेत प्रशिक्षण घेतले. अख्तर यांनी राष्ट्रीय शैक्षिक योजना आणि प्रशासन संस्थेत (NUEPA) १५ वर्षे काम केले, जिथे त्यांनी १३० देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी अभ्यासक्रम चालवले.  

प्रा. नजमा अख्तर युनेस्को (UNESCO), युनिसेफ (UNICEF) आणि डानिडा (DANIDA) यांच्या सल्लागारही राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्व क्षमतेसाठी, लैंगिक समानतेच्या खंद्या समर्थक म्हणून आणि विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या संघांचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या नजमा अख्तर यांना २०२२ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इरफान हबीब

इरफान हबीब प्रख्यात इतिहासकार आहेत. त्यांनी भारताच्या मध्ययुगीन इतिहासावर आणि कृषी प्रणालीवर सखोल संशोधन केले. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘The Agrarian System of Mughal India’ हे ऐतिहासिक अभ्यासातील एक मूलभूत कार्य मानले जाते. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठात दीर्घकाळ प्राध्यापक होते. 

भारतात धर्मनिरपेक्ष इतिहास लेखनाचे हबीब प्रमुख आधारस्तंभ बनले. त्यांनी ‘भारत का जनवादी इतिहास’ सारख्या महत्त्वपूर्ण मालिकांचे संपादन केले आणि भारतीय इतिहासाला मार्क्सवादी दृष्टिकोनातून स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना इतिहास लेखनातील बौद्धिक क्रांतीचे जनक म्हटले तर वावगे ठरणार नाही.

उबैद सिद्दीकी

उबैद सिद्दीकी हे भारतीय जैविक विज्ञानातील एक अग्रणी वैज्ञानिक, संस्था-निर्माते आणि प्रेरणास्रोत होते. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून केली आणि नंतर युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमधून पीएचडी केली. पोस्ट-डॉक्टरल संशोधनादरम्यान, त्यांनी ई. कोलायच्या (E. coli) अल्कलाईन फॉस्फेटेज जनुकातील उत्परिवर्तनाचा (mutation) शोध लावला, जो नंतर ‘स्टॉप’ कोडोनच्या सिद्धांताचा पाया बनला. 

१९६२ मध्ये, होमी भाभा यांच्या निमंत्रणावरून, सिद्दीकी यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये (TIFR) आण्विक जीवशास्त्र युनिटची स्थापना केली. १९७० च्या दशकात, त्यांनी फळमाशी (Drosophila melanogaster) मधील तापमान-संवेदनशील पैरालिटिक उत्परिवर्तकांचा शोध लावला, ज्यामुळे चेतासंस्थेच्या कार्यप्रणालीच्या (synaptic transmission) अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. 

१९९०च्या दशकात, त्यांनी बंगळूरमध्ये नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसची (NCBS) सह-स्थापना केली आणि त्याचे पहिले संचालक बनले. उबैद सिद्दीकी यांना त्यांच्या योगदानासाठी 'पद्मभूषण' (१९८४) आणि 'पद्मविभूषण' (२००६) यांसारखे प्रतिष्ठित नागरी पुरस्कार मिळाले.