भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतींना पंतप्रधानांकडून उजाळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शूर देशभक्तांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या धाडसाने देशभक्तीची एक ठिणगी पेटवली, ज्यामुळे स्वातंत्र्यासाठी झटणारे असंख्य लोक एकत्र आले, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले की, "बापूंच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या सर्व शूर देशभक्तांना आम्ही मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धाडसाने देशभक्तीची एक ठिणगी पेटवली, ज्याने स्वातंत्र्यासाठी झटत असलेल्या असंख्य लोकांना एकत्र आणले." 

आज, ९ ऑगस्ट रोजी या ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनाला ८३ वर्षे पूर्ण होत आहेत. याच दिवशी, ९ ऑगस्ट १९४२ रोजी, मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनातून महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीला भारतातून निघून जाण्याचा अखेरचा इशारा दिला होता. 'करो या मरो' या त्यांच्या संदेशाने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची एक नवी लाट निर्माण केली होती.

या आंदोलनाने ब्रिटिश राजवटीचे धाबे दणाणले होते. यानंतर ब्रिटिशांनी गांधीजींसह संपूर्ण काँग्रेस नेतृत्वाला अटक केली. मात्र, या आंदोलनाने देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि सामान्य नागरिकांनाही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. या आंदोलनाने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला असे मानले जाते. याच ऐतिहासिक दिनाचे स्मरण करत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानाला अभिवादन केले आहे.