स्वतंत्र भारतात, मुस्लिम विविध क्षेत्रांमध्ये देश आणि राष्ट्राची सेवा करत आले आहेत. देशाने त्यांच्या या सेवांची प्रशंसा केली आणि त्यांना आदर व सन्मान दिला. त्यापैकी एक क्षेत्र म्हणजे विज्ञान. स्वातंत्र्यानंतर एकापेक्षा एक सरस शास्त्रज्ञ पुढे आले आणि त्यांनी आपल्या शोधांनी व अविष्कारांनी आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. मग ते वैद्यकीय विज्ञान असो वा अंतराळ विज्ञान, भारतीय मुस्लिमांनी स्वतःला इतिहासाचा एक भाग बनवले.
देशाच्या फाळणीनंतर बहुसंख्य सुशिक्षित मुस्लिम सीमेपलीकडे गेले होते हे सत्य असले तरी, भारतालाच कर्मभूमी बनवलेल्या मुस्लिमांन मिळालेले मोकळे वातावरण आणि उत्तम संधींमुळे त्यांनी इतर क्षेत्रांप्रमाणेच विज्ञानातही यश मिळवले आहे. जाणून घेऊयात, स्वतंत्र भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा महान भारतीय मुस्लीम वैज्ञानिक
१. डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या नावाने प्रसिद्ध असलेले डॉ. अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम २२ मे १९८९ रोजी चांडीपूर (ओरिसा) येथून 'अग्नी'च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे 'भारताचे मिसाईल मॅन' म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले. भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ राहिलेल्या कलाम यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे राष्ट्रपतीपदही भूषवले.
१९३१ मध्ये तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्मलेले डॉ. अब्दुल कलाम यांनी एरो इंजिनिअरिंगमध्ये डीएमायटी (DMIT - मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डिप्लोमा) पदवी घेतली होती. त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे (DRDL) संचालक होण्यापूर्वी ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO) ASL-V मिशनचे प्रभारी संचालक होते. ते इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो आहेत.
'अग्नी' क्षेपणास्त्रामागे डॉ. अब्दुल कलाम यांचाच बुद्धीचा हात होता; हे १७ मीटर लांब आणि ७५ टन वजनाचे, १००० किलो वजनाची स्फोटके वाहून नेणारे स्वदेशी बनावटीचे बहु-टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता १६०० ते २५०० किलोमीटर आहे. त्यांना ४०० शास्त्रज्ञांच्या मोठ्या टीमने मदत केली होती.
त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे, तिसऱ्या जगातील देशांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नाकारणाऱ्या सात पाश्चात्य देशांच्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजीम (MTCR) च्या अटींवर भारताने मात केली. मे १९९८ मध्ये, त्यांची संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान केला.
२. सय्यद जहूर कासिम
डॉ. जहूर कासिम भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेसाठी ओळखले जातात. सय्यद जहूर कासिम (३१ डिसेंबर १९२६ – २० ऑक्टोबर २०१५) हे भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ होते. कासिम यांनी भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केले आणि १९८१ ते १९८८ या काळात इतर सात मोहिमांना मार्गदर्शन केले. ते १९९१ ते १९९६ या काळात भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य होते.
डॉ. जहूर १९८९ ते १९९१ या काळात जामिया मिलिया इस्लामियाचे कुलगुरू होते आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, मदुराई कामराज विद्यापीठ, अण्णामलई विद्यापीठ, आयआयटी मद्रास आणि जामिया मिलिया इस्लामिया यांसारख्या विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
३. डॉ. ओबैद सिद्दीकी
न्यूरोबायोलॉजी आणि जेनेटिक्समधील तज्ञ डॉ. ओबैद सिद्दीकी हे भारतातील प्रमुख शास्त्रज्ञ होते, ज्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
ओबैद सिद्दीकी यांचा जन्म १९३२ मध्ये उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात झाला. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि एमएससी पूर्ण केले. त्यांनी ग्लासगो विद्यापीठातून गाइडो पोंटेकोर्वो यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली. त्यांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन केले.
१९६२ मध्ये होमी भाभा यांच्या निमंत्रणावरून त्यांनी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये (TIFR) मॉलिक्युलर बायोलॉजी युनिटची स्थापना केली. तीस वर्षांनंतर, ते बंगळूरमधील टीआयएफआर नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसचे संस्थापक संचालक बनले, जिथे त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपले संशोधन सुरू ठेवले.
डॉ. ओबैद सिद्दीकी इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य आणि वॉशिंग्टनच्या यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. त्यांना १९८४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
४. डॉ. सलीम अली
'बर्ड मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे, सलीम मोइझुद्दीन अब्दुल अली, म्हणजेच सलीम अली, यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ रोजी झाला. पक्षीशास्त्रातील (ornithology) त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना जे. पॉल गेट्टी वन्यजीव संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक राष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कारही जिंकले आहेत.
आश्चर्य म्हणजे, सलीम अली यांच्याकडे कोणतीही विद्यापीठाची पदवी नव्हती. आणि ते विणकर पक्ष्यांचे (weaver birds) जगप्रसिद्ध तज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले. सलीम यांनी फिनच्या बाया (Finn's Baya) पक्ष्याचा शोध लावला, जो १०० वर्षांपासून नामशेष झाल्याचे मानले जात होते, पण त्यांनी तो कुमाऊँच्या टेकड्यांमध्ये शोधून काढला.
१९४१ मध्ये त्यांनी 'द बुक ऑफ इंडियन बर्ड्स' प्रकाशित केले, ज्यात प्रत्येक प्रजातीचे सजीव वर्णन आणि रंगीत चित्रे होती. यामुळे सामान्य माणसाला पक्षी ओळखणे सोपे झाले. १९४८ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ एस. डिलन रिपले यांच्या सहकार्याने 'हँडबुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान' या दहा खंडांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात केली.
या ग्रंथात उपखंडातील पक्ष्यांविषयी सर्व ज्ञात माहिती, त्यांचे स्वरूप, ते सामान्यतः कुठे आढळतात, त्यांच्या प्रजननाच्या सवयी, स्थलांतर आणि त्यांच्याबद्दल आणखी काय अभ्यास करणे बाकी आहे, या सर्वांचा समावेश आहे. सलीम अली यांनी आपल्या पक्षी-निरीक्षण सर्वेक्षणासाठी संपूर्ण भारतभर प्रवास केला. असे म्हटले जाते की देशात अशी कोणतीही जागा नाही जिथे त्यांच्या जड रबरी बुटांचे ठसे उमटले नाहीत.
५. इब्राहिमअली अबूबकर सिद्दीक
इब्राहिमअली अबूबकर सिद्दीक (जन्म १९३७) हे प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या अनुवंशशास्त्र आणि वनस्पती प्रजननातील संशोधनामुळे बौनी बासमती (dwarf basmati) आणि संकरित तांदूळ (hybrid rice) यांसारख्या विविध उच्च-उत्पादन देणाऱ्या तांदळाच्या जाती विकसित करण्यास मदत झाली. भारत सरकारने २०११ मध्ये सिद्दीक यांना चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले.
त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६८ मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत (IARI) सायटोजेनेटिसिस्ट म्हणून झाली. १९८३ मध्ये, त्यांना तांदूळ प्रजनन तज्ञ म्हणून इजिप्तमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आणि १९८६ मध्ये त्यांची फिलीपिन्समध्ये अनुवंशशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बदली झाली. पुढील वर्षी, १९८७ मध्ये, ते हैदराबाद येथील तांदूळ संशोधन संचालनालयाचे प्रकल्प संचालक म्हणून भारतात परतले. त्यानंतर ते नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेत (ICAR) उपमहासंचालक बनले.
१९९७ मध्ये सिद्दीक यांना आयसीएआरचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले आणि २००२ मध्ये त्यांनी सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्सचा (CDFD) कार्यभार स्वीकारला.
६. सय्यद ई. हसनैन
सय्यद ई. हसनैन यांनी अमेरिकेतील टेक्सास ए अँड एम विद्यापीठात अनेक वर्षे घालवली आणि १९८७ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजीमध्ये (NII) शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी ते भारतात परतले. हसनैन यांची फेब्रुवारी १९९९ मध्ये सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्सचे (CDFD) पहिले संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी २००५ ते २०११ या काळात हैदराबाद विद्यापीठाचे ७ वे कुलगुरू म्हणून काम पाहिले.
२ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांनी जामिया हमदर्द, नवी दिल्लीचे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला आणि २०२१ पर्यंत या पदावर काम केले. ते आयआयटी, दिल्ली येथे आमंत्रित प्राध्यापक (२०११-२०१८) होते आणि सध्या ते आयआयटी, दिल्ली येथे एसईआरबीच्या पहिल्या ५ राष्ट्रीय विज्ञान अध्यासनांपैकी (National Science Chair) एक म्हणून कार्यरत आहेत.
७. सिब्ते हसन झैदी
सिब्ते हसन झैदी हे भारतीय पॅथॉलॉजिस्ट आणि टॉक्सिकोलॉजिस्ट होते, जे प्रायोगिक विषशास्त्रातील (experimental toxicology) त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी लंडनच्या हॅमरस्मिथ हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले, जिथे त्यांनी विषशास्त्रात संशोधनही केले. आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, झैदी प्रायोगिक विषशास्त्रात संशोधन करण्यासाठी भारतात परतले.
सिब्ते हसन झैदी यांच्या कार्याचा भर औद्योगिक विषाच्या जैविक परिणामांवर होता आणि त्यांनी पर्यावरण आणि व्यावसायिक आरोग्य धोक्यांसंबंधीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये भाग घेतला. झैदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अनेक समित्यांवरही काम केले, जिथे त्यांनी विषशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्यावर तज्ञ सल्ला दिला. त्यांना भारत सरकारने १९७७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
८. डॉ. चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाह
भारतातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या वैद्यकीय शाखेतील योगदानासाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणजे चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाह. १९३७ मध्ये दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात जन्मलेल्या हबीबुल्लाह यांनी १९५८ मध्ये गुंटूर मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली, त्यानंतर त्यांनी आंध्र विद्यापीठातून जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी (MD) आणि चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमधून डीएम पदवी मिळवली.
डॉ. चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाह यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात उस्मानिया मेडिकल कॉलेजच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून केली आणि १९७५ ते १९९२ या काळात ते प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते आणि त्यानंतर १९९४ पर्यंत प्राचार्य होते. ते नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियाचे १९९७ चे फेलो होते आणि त्यांच्या नावावर अनेक वैज्ञानिक प्रकाशने आहेत.
१९९७ मध्ये ख्वारिझ्मी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्त्या हबीबुल्लाह यांना भारत सरकारने २००१ मध्ये चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले. १० जुलै २०१० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
९. डॉ. कमर रहमान
कमर रहमान गेल्या ४० वर्षांपासून नॅनोकणांच्या शारीरिक परिणामांवर विस्तृत काम केले आहे. ॲस्बेस्टॉस, स्लेटची धूळ आणि इतर घरगुती व पर्यावरणीय कणांच्या प्रदूषणाच्या परिणामांवर आणि व्यावसायिक आरोग्य सुधारण्याच्या मार्गांवर केलेल्या कामासाठी त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जातात.
डॉ. कमर रहमान यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी एका वर्षाआधी शहाजहानपूरमधील एका प्रतिष्ठित विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज शहाजहानच्या काळात अफगाणिस्तानातून भारतात आले होते. कुटुंबातील रूढीवादी परंपरेला न जुमानता, त्यांनी विज्ञान क्षेत्रात यश मिळवले.
डॉ. कमर रहमान या भारतातील दहा महिला शास्त्रज्ञांपैकी एक आहेत आणि जर्मनीच्या सहाशे वर्षे जुन्या प्रतिष्ठित रॉस्टॉक विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत. हे तेच व्यासपीठ आहे जिथे वैज्ञानिक जगातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व, आइन्स्टाईन यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना प्रतिष्ठित विज्ञान विभूषण आणि यश भारती पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.
डॉ. कमर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थ्यांनी आपले पीएचडी संशोधन पूर्ण केले. डॉ. कमर रहमान यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार पॅनेलवर असण्याचा मान मिळाला आहे. त्या जर्मनीच्या रॉस्टॉक विद्यापीठात आणि लखनऊच्या ॲमिटी विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
१०. डॉ. इसरार अहमद
डॉ. इसरार अहमद, सेंटर फॉर प्रमोशन ऑफ सायन्स, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU), अलीगढचे संचालक, एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. त्यांना सैद्धांतिक अणुभौतिकी (Theoretical Nuclear Physics) आणि क्वांटम स्कॅटरिंग थिअरीमध्ये अधिकारी व्यक्ती मानले जाते. याशिवाय, ते १९८६ पासून एएमयूचे उर्दू मासिक 'तहजीबुल अखलाक' आणि हिंदी मासिक 'निशांत' यांचे संपादन करतात.
१९ डिसेंबर १९४० रोजी जन्मलेले डॉ. इसरार अहमद हे श्री मुख्तार अहमद यांचे सुपुत्र आहेत. १९५९ मध्ये गोरखपूर विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि एएमयू मधून भौतिकशास्त्रात पीएचडी केली. ते १९६१ मध्ये एएमयूमध्ये व्याख्याता म्हणून रुजू झाले. १९८४ पासून ते भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
त्यांचे ४८ शोधनिबंध आतापर्यंत आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. अनेक संशोधकांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम.फिल आणि पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. इसरार अहमद हे दिवंगत नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अब्दुस सलाम यांच्या नेतृत्वाखालील ट्रायस्टे (इटली) येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्सचे सहयोगी सदस्य आहेत.
डॉ. इसरार अहमद न्यूयॉर्क ॲकॅडमी ऑफ सायन्सेस तसेच इंडियन फिजिक्स असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांनी अनेक विज्ञान अभ्यासक्रम मुस्लिम धार्मिक शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित केले. याशिवाय, ते हिंदी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये विज्ञान कथा लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.