छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 30 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या कारवाई एका महिला कॅडरसह ६ नक्षलवादी ठार झाले आहेत, एका पोलिस अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता. 

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी मोहिम आखली आहे.  

बुधवारी सकाळी बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावाच्या जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला.

यावेळी लपून बसलेल्या नलक्षवाद्यांनी सुरक्षा दलांच्या पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत एका महिला कॅडरसह ६ नक्षलवादी ठार झाले. या भागात अद्याप शोधमोहीम सुरु आहे.

या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान सहभागी झाले होते, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी सांगितले.