'भारतासारख्या मजबूत मित्रराष्ट्रासोबतचे संबंध खराब करू नका'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 24 d ago
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय-अमेरिकन रिपब्लिकन नेत्या निक्की हेली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय-अमेरिकन रिपब्लिकन नेत्या निक्की हेली

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क आणि रशियन तेल खरेदीवरून भारतावर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय-अमेरिकन रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांनी मंगळवारी (५ ऑगस्ट) म्हटले आहे की, अमेरिकेने भारतासारख्या 'मजबूत मित्रराष्ट्रासोबतचे' संबंध खराब करू नयेत आणि चीनला मोकळीक देऊ नये.

निक्की हेली यांनी 'एक्स'वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले, "भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. पण चीन, जो आपला प्रतिस्पर्धी आहे आणि रशिया आणि इराणकडून सर्वात जास्त तेल खरेदी करतो, त्याला ९० दिवसांसाठी शुल्क आकारणीतून सूट मिळाली आहे." "चीनला मोकळीक देऊ नका आणि भारतासारख्या मजबूत मित्रराष्ट्रासोबतचे संबंध खराब करू नका," असेही त्या म्हणाल्या.

ट्रम्प यांचा भारतावर हल्ला
हेली यांनी हे वक्तव्य ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांनी केले. भारताने रशियाकडून तेल खरेदी करून 'युद्धतंत्राला' बळ देत असल्यामुळे भारत एक 'चांगला व्यापारी भागीदार' नाही, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे पुढील २४ तासांत भारतावर शुल्क 'लक्षणीय' वाढवण्याची घोषणाही त्यांनी केली होती.

हेली, ज्या दक्षिण कॅरोलिनाच्या माजी राज्यपाल आहेत, त्या ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळात संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत होत्या. त्या अमेरिकेच्या प्रशासनात कॅबिनेट स्तरावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व्यक्ती होत्या.

भारताची तीव्र प्रतिक्रिया 
२०१३मध्ये त्यांनी २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती, पण गेल्या वर्षी मार्चमध्ये त्या या शर्यतीतून बाहेर पडल्या. भारताने सोमवारी अमेरिकेवर आणि युरोपीय संघावर पलटवार करत रशियन कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारताला लक्ष्य करणे ‘अन्यायकारक आणि अवाजवी’ असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या ऊर्जा संबंधांवरून भारताच्या वस्तूंवर शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर भारताची ही प्रतिक्रिया आली होती.