‘या’ पाच विषयांवर असणार संघाचा भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टीम

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला येत्या २०२५ ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक अडचणींवर मात करीत स्वयंसेवकांनी संपूर्ण समाजाच्या सहकार्याने हे कार्य विस्तारले आहे. संघ स्थापनेनंतरचा जवळ-जवळ २२ वर्षांचा काळ स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचा होता.

या काळात संघ स्वयंसेवक एकीकडे स्वातंत्र्याच्या संघर्षात सक्रिय सहभाग घेत व बरोबरीने संघ शाखांचा विस्तार करीत संपूर्ण समाजात ‘स्व’ ची भावना मजबूत करीत होते. संघाच्या स्थापनेनंतर लवकरच डॉक्टर केशव बळिराम हेडगेवारांच्या प्रेरणेने १९३६ मध्ये संघाच्या धर्तीवर महिला वर्गात कार्य करण्यासाठी वंदनीय मावशी अर्थात लक्ष्मीबाई केळकर यांनी ‘राष्ट्र सेविका समिति’ची सुरवात केली.

१९४७ पूर्वी स्वयंसेवक राष्ट्राच्या स्वातंत्र्याची शपथ घेत, स्वातंत्र्यानंतर त्याऐवजी हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती हे ध्येय जोडण्यात आले. स्वाभाविकच संघकार्याचा विस्तार होत असताना स्वयंसेवक जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील घडामोडींविषयात सर्वोपांग चर्चा करीत असत व त्या क्षेत्रातल्या बदलांवर देखील विचारविनिमय होत असे.

खुद्द डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनात त्यांचा वेगवेगळ्या सामाजिक कार्यात व्यापक सहभाग व त्यावरील भारतीय दृष्टीने आवश्यक रचनेसंदर्भातील कल्पना अनुभवास येते. पुढील काळात क्रमाक्रमाने जीवनाच्या विविध क्षेत्रांत स्वयंसेवकांनी अनेक संघटनांची सुरवात केली. कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी भारतीय मजदूर संघाची (बीएमएस) लवकरच स्थापना झाली व आज अशा मुख्य संघटनांची संख्या ३६ असून त्याशिवाय काही प्रांतांपुरत्या मर्यादित अशा अन्य संघटनाही आहेत.

‘राष्ट्रहित हे सर्वप्रथम’ यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता त्या क्षेत्रातील व्यवस्था सामान्य लोकांसाठी सुलभ बनविणे व नव्या रचना शुद्ध भारतीय चिंतनावर अर्थात स्व आधारित करण्याच्या दिशेने सतत प्रयत्न करीत जाणे, या मूळ उद्देश्यांना पुढे ठेवून या संघटनाची बांधणी केली गेलेली आहे. व्यवस्था परिवर्तनाचे मुख्य कार्य या संघटनांचे दूरगामी लक्ष्य बनले आहे.

संघ आपली शक्ती मुख्यत: व्यक्तिनिर्माणाचे कार्यात लावतो व त्या मुशीतून तयार झालेले काही कार्यकर्ते प्रत्यक्ष संघाचे व्यक्तिनिर्माणाचे शाखाकार्य करीत असतात तर अन्य स्वयंसेवक या विविध संघटनांमध्ये सक्रिय होतात.
 
प्रारंभीच्या काळात स्वयंसेवक पाठविले गेले परंतु आता संघटनांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या मागणीवरून दिले जातात तर काही स्वत:च्या आवडीनुसारही या संघटनांमध्ये कार्य करू लागतात. जसाजसा संघटनांचा विस्तार होत आहे, तसतसे स्वयंसेवक नसलेले अनेक नवीन लोक त्या संघटनांच्या संपर्कात येऊन तेथे हिरिरीने वेगवेगळ्या प्रमुख जबाबदाऱ्या घेऊन कार्य करू लागतात.

असे लोक देखील हळूहळू संघाच्या कार्याशी परिचित होत जातात व स्वयंसेवक बनतात. अर्थात स्वयंसेवक भावनेशी समरस होतात. अशा नवीन लोकांसाठी संघटनांच्या अपेक्षेनुसार प्रसंगी ‘संघ परिचय वर्ग’ही स्थानो-स्थानी केले जातात. ही प्रक्रिया समन्वयाच्या सकस भावनेने संघ व संघटना दोघांनाही सातत्याने पुष्ट करीत आहे.

या सर्व संघटनांमध्ये स्वयंसेवक असले, तरी या त्या-त्या क्षेत्रातील स्वतंत्र व स्वायत्त अशा स्वरूपाच्या संघटना आहेत. या सर्व संघटना संघप्रेरित असल्या व त्यात चांगल्या प्रमाणात स्वयंसेवक असले, तरी त्या सर्वांची निर्णय घेण्याची पद्धती स्वतंत्र आहे व यांच्या व्यापामागे तसेच त्यांना समाजात मिळालेल्या मोठ्या मान्यतेचे कारण त्यांचे हे स्वरूप आहे.

या संघटना वेळोवेळी आवश्यकतेनुसार संघाचा सल्ला घेत असल्या, तरी ते स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेतात व त्या साठी आपली शक्ती पणाला लावतात. यशापयशाची जबाबदारी देखील स्वतः घेतात, त्यामुळे एक विश्वसनीय संघटन म्हणून त्यांचा सातत्याने विकास होत आहे. ही बाब जशी विश्व हिंदू परिषदेला लागू होते, ती तशीच भाजपाला देखील लागू पडते.

त्यामुळे संघाच्या या पद्धतीमध्ये संघावर आधारित पंगू संघटनांऐवजी मजबूत, स्वतंत्र, स्वायत्त व स्वावलंबी अशा सतत विकासशील व व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने ठोस कार्य करणाऱ्या लोकजीवनातील महत्त्वपूर्ण संघटनाची एक मालिकाच तयार झालेली आहे. यात भविष्यातील आवश्यकतेनुसार नवनवीन संघटना तयार करण्याची एक उपजत क्षमताही उत्पन्न झाली आहे.

समन्वयाच्या औपचारिक प्रक्रियेत प्रांत व अखिल भारतीय स्तरावर वार्षिक समन्वय बैठकीचे आयोजन होत असते. याशिवाय स्थानीय स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत विविध प्रकारच्या अनेक औपचारिक व अनौपचारिक बैठकींचे आयोजन वेळोवेळी होत असते.

संघाच्या या बैठकींमध्ये संघटनांचे प्रचारक वा संघटनमंत्री यांच्या सहित प्रमुख पदाधिकारी देखील भाग घेत असतात. १४-१६ सप्टेंबरदरम्यान पुण्यात आयोजित अखिल भारतीय समन्वय बैठकीत ३६ संघटनांचे व संघाचे प्रमुख २४३ पदाधिकारी सहभागी होते.

या बैठकी निर्णयाच्या नसून एकमेकांचे कार्यविस्तार, उपलब्धी व वर्तमान परिस्थितीत वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयावरील अनुभव, मते तसेच चाललेले प्रयत्न यांच्या देवाणघेवाणीतून आपल्या दृष्टी व्यापक करणाऱ्या असतात. शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवीत असतानाच शिक्षणाला भारतीय दृष्टिकोन देण्याचा सतत प्रयत्न संघप्रेरित शिक्षण क्षेत्रातील सक्रिय विद्यार्थी परिषद, विद्याभारती, शैक्षिक महासंघ इत्यादी संघटना करीत आहेत.
 
स्वाभाविकच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उत्तम रीतीने लागू होण्यासाठी आवश्यक बाबींवर ते सतत प्रयत्नशील आहेत. तसेच आर्थिक व सामाजिक, वैचारिक क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवर अनेक मुद्द्यांवर परस्पर सहमती तयार करण्याचा प्रयत्नही अशा बैठकींमधून होत असतो.

जेव्हा काही विचार प्रत्येक गटाला वेगवेगळे परस्पर संघर्षात ठेवत संपूर्ण रचना उभारत होते, त्या वेळी हिंदुत्वाला अभिप्रेत परिवार भावनेने कार्य करण्याच्या संघ शिकवणीतून प्रेरित या सर्व संघटनांच्या उभारणीस सुरवात झाली.

कामगार व मालक अथवा प्रबंधन याला एक परिवार मानून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात बीएमएस असतो तर शैक्षणिक परिवाराच्या भावनेतून विद्यार्थी परिषद प्रयत्नात असते. सेवा भारतीसारखे संघटन समाजातील सर्व सेवाभावी संस्थांसोबत समन्वय करीत कार्यात संघटनेपेक्षा समाजाला अधिक महत्त्व देताना अनुभवाला येते.

सर्व संघटनांमधील महिलांच्या सहभागाबद्दल अशा प्रत्येक बैठकींच्या चर्चेत महत्त्वाचा विषय असतो. यासाठी ‘महिला समन्वय’ अशी एक अतिरिक्त विशेष व्यवस्थाही गेल्या काही वर्षांत उभारली गेली आहे, ज्या अंतर्गत सर्वच विविध संघटनांमधील महिलांच्या नेतृत्व विकासाकडे व सहभाग वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

अन्य संघटनांप्रमाणे अशा बैठकीत भाजपाचे कार्यकर्ते देखील राजकीय परिस्थिती, त्यांचे प्रयत्न व यशापयशाच्या शक्यतेसंदर्भात त्यांचे आकलन मांडीत असतात. बाहेरून लोक त्या वेळच्या परिस्थितीनुसार अशा बैठकींसंदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त करीत असतात.

परंतु संघाच्या समन्वय पद्धतीत सांगोपांग चर्चा नियमितपणे सुरू असतात. या प्रक्रिया देखील सतत येणाऱ्या अनुभवातून समृद्ध होत आहेत. लोकहिताच्या दृष्टीने योग्यवेळी स्पष्ट बोलण्याचे कर्तव्यपालन करीत मनभेद होणार नाहीत याची हातोटी देखील सर्व संघटना अनुभवातून विकसित करीत आहेत.

संघभावनेने सर्वांनी कार्य करावे, ही रास्त अपेक्षा संघटनांकडून केली जाते. सामूहिक पद्धतीने निर्णय, कार्यकर्त्यांच्या विकासासाठी त्यांच्या सहभागाचा आग्रह, शुद्ध भावनेने कार्य व जीवनमूल्यांवर तडजोड न करता लोककल्याण करीत राहण्याची भावना या सामान्य परंतु महत्त्वाच्या बाबींवर भर दिला जातो.

सर्व संघटना लोकहिताच्या मुद्द्यावर खोलवर अभ्यास करीत, मार्ग काढण्याचा, त्यासाठी आवश्यक लोकशिक्षण करीत समाजाच्या विविध घटकांना सोबत घेत व्यवस्था परिवर्तानाच्या कार्यात सक्रिय आहेत. प्रसंगी संघटनांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असले किंवा भाजपाशासित सरकारांच्या व संघटनांच्या भूमिकेत फरक असला, तरी मार्ग काढला जातो तर कधी-कधी मतभेदासहित मनभेद न करता पुढे जाण्यावर परस्पर सहमती बनते.

पुणे समन्वय बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समाज परिवर्तनाच्या आग्रहापोटी जन्मलेल्या या सर्व संघटना सध्या पाच मुख्य विषयांवर आग्रही आहेत. जीवनमूल्यांवर आधारित परिवार व्यवस्था उभी करणे, पर्यावरणाला पोषक जीवनशैलीचा प्रसार, व्यक्तिगत-परिवारात-सामाजिक जीवनात समता-समरसतेचा अवलंब, सर्वप्रकारे स्वदेशीचा अर्थात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘स्व’ चे प्रकटीकरण तसेच दैनंदिन जीवनात नागरिक कर्तव्यांचे पालन या विषयांवर सर्व संघटना आपापल्या क्षेत्रात सर्वांगाने पुढाकार घेताना पुढील काळात दिसतील.

संघप्रेरित या सर्व संघटना परिवार भावनेने सतत समन्वय साधत पुढे जात आहेत, संघासहित या सर्वांचे दरवाजे समस्त भारतीयांच्या सेवेसाठी व स्वागतासाठी पूर्णतः चोवीस तास मोकळे आहेत.

- सुनील आंबेकर
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत.) 
 
(सौजन्य : सकाळ)